नागपूर : विवेकबुद्धी असणाऱ्या कोणत्याही तरुणीने अनोळखी तरुणासोबत पहिली भेट घेण्यासाठी हॉटेल रूममध्ये जाऊ नये, असे मत मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने बलात्काराचा आरोप असलेल्या तरुणाची सुटका करताना व्यक्त केले. हायकोर्टाने अत्याचाराचा आरोप करणाऱ्या तरुणीची कथा अमान्य असल्याचे मत व्यक्त करत आरोपीला दहा वर्षांची दिलेली शिक्षा रद्द केली. याप्रकरणी न्यायमूर्ती गोविंद सानप यांच्यासमक्ष सुनावणी झाली.
आरोपी राहुल लहासे याची पीडित तरुणीसोबत फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली होती. जळगाव येथील रहिवासी असलेल्या राहुलने मार्च २०१७ रोजी अमरावतीच्या अंजनगावसुर्जी येथे राहत असलेल्या तरुणीला भेटण्यासाठी तिच्या गावाजवळच्या एका हॉटेलमध्ये बोलाविले होते. तरुणी तेव्हा बारावीत शिकत होती. तरुणी हॉटेलमध्ये गेल्यावर राहुलने काही महत्त्वपूर्ण चर्चा करायची असल्याचे कारण देत तिला रूममध्ये नेले. रूममध्ये आरोपीने तरुणीसोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
यादरम्यान त्याने तरुणीचे आक्षेपार्ह छायाचित्रही काढले. काही दिवसांनंतर त्यांची मैत्री तुटल्याने तरुणाने ते छायाचित्र फेसबुकवर टाकले तसेच तरुणीच्या होणाऱ्या नवऱ्यालाही पाठविले. यानंतर ऑक्टोबर २०१७ मध्ये तरुणीने आरोपीविरोधात अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अचलपूर सत्र न्यायालयाने याप्रकरणी आरोपीला दहा वर्षांची शिक्षा ठोठावली होती. या शिक्षेच्या विरोधात आरोपीने हायकोर्टात अपील दाखल केले. हायकोर्टाने आरोपीची शिक्षा रद्द करत त्याची निर्दोष सुटका करण्याचे आदेश दिले.
तरुणीने तरुणाला भेटण्याकरिता हॉटेलमध्ये जाऊ नये. तरुणाच्या वतीने अशी मागणी करणे हे धोकादायक संकेत आहेत. जरी तरुणी काही कारणास्तव गेली, तरी अडचणीच्या स्थितीत तिने मदतीसाठी आरडाओरड करणे अपेक्षित असते. याप्रकरणी तरुणीने सांगितलेली गोष्ट विश्वासार्ह नाही. तरुणाने फेसबुकवर छायाचित्र टाकल्यावर तरुणीच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती मिळाली. यानंतरही तक्रार दाखल करण्यात उशीर झाला. फेसबुकवर केवळ छायाचित्र अपलोड केले म्हणून आरोपीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले असल्याचा निष्कर्ष काढता येत नाही, असे मत हायकोर्टाने निर्णय देताना नोंदविले. पुरावे आणि तरुणीच्या संशयास्पद कथेच्या आधारावर हायकोर्टाने आरोपीची निर्दोष सुटका केली.