उरुळी कांचन, (पुणे) : पुणे (हवेली) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी दत्तात्रय यशवंत पायगुडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर पुणे बाजार समितीच्या सभापतीपदाच्या पदावरुन रस्सीखेच सुरु होते. त्या पार्श्वभूमीवर उपसभापतीपदी मनोमिलन झाले की काय? अशी चर्चा रंगली होती. दरम्यान, उपसभापती दत्तात्रय पायगुडे यांची बिनविरोध निवड झाल्याने सभापतीपदासाठी दहा संचालकांनी अविश्वास ठराव आणणऱ्या गटाने सुटकेचा निश्वास सोडला आहे.
पुणे बाजार समितीच्या सभापती दिलीप काळभोर यांच्या विरोधात अविश्वास ठराव बारगळल्यानंतर अविश्वास ठरावाला विरोध करणाऱ्या एका संचालकाने उपसभापतीपदाची निवडणूक लढविण्यासाठी काही लोकांना संपर्क केल्याने उपसभापतीपदाची निवडणूक रंगतदार झाली होती. तसेच सभापतींवर अविश्वास ठराव आणणारे काही संचालक उपसभापतीपदासाठी दगाफटका घडू नये, यासाठी बाहेरगावी गेल्याने आज होणारी निवडणूक बाजार समितीच्या दोन गटांत होणार असल्याची चर्चा रंगली होती.
मात्र, अविश्वास ठरावाला विरोध करणाऱ्या आठ संचालकांनी उपसभापतीपदासाठी दत्तात्रय पायगुडे यांच्या पाठिशी राहण्याचा निर्णय घेतला. तसेच उपसभापतीपदासाठी दत्तात्रय पायगुडे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक बिनविरोध झाली आहे.