पुणे : राज्यभर गणेशोत्सवाचा आनंद साजरा होत असताना पुण्यात मात्र या उत्सवाला गालबोट लागले आहे. मावळात घरगुती गणपती मूर्तीचे विसर्जन करायला गेलेल्या बाप लेकाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मावळातील कडधे या गावात घडली आहे. वडिलांचा मृतदेह सापडला असून मुलाच्या मृतदेहाचा पाण्यात शोध घेण्याचं काम सुरू आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संजय धोंडू शिर्के या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या वडिलांचं नाव आहे. तर हर्षल संजय शिर्के या मुलाचा मृतदेह पाण्यात शोधण्याचं काम अद्याप सुरू आहे. कडधे गावात हे बाप, लेक घरगुती गणपती मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी घराच्या जवळ असलेल्या माळावर उत्खनन केलेल्या जागेत साचलेल्या पाण्याच्या डबक्यात गेले होते.
मुलगा हर्षल शिर्के बुडत असल्याचे दिसताच त्याला वाचवण्यासाठी बापाने पाण्यात उडी घेतली, परंतु नियतीला दुसरच मंजूर होतं. बाप-लेक दोघेही पाण्यात बुडाले आहे. घटनास्थळी वन्यजीव रक्षक मावळ टीम, कामशेत पोलिस आणि लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्कू टीमने धाव घेतली. रेस्कू टीमच्या शोध मोहिमेत वडिल संजय शिर्के यांचा मृतदेह सापडला असून मुलाचा पाण्यात शोध सुरू आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार कडधे येथे संजय शिर्के व हर्षल शिर्के यांनी घरगुती गणपती मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी त्यांच्या घराजवळ असलेल्या माळावर उत्खनन केलेल्या खाणींमध्ये साचलेल्या पाण्यात गेले, यावेळी मुलगा हर्षल शिर्के बुडत असताना, त्याचे वडील संजय शिर्के यांनी पाण्यात उडी घेतली, मात्र, दोघेजण पाण्यात बुडाले.
या घटनेची माहिती मिळताच कामशेत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. शिवदुर्ग मित्र लोणावळा यांनी मृतदेह बाहेर काढला. गणेशोत्सव काळात शिर्के कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.