उरुळीकांचन : पुणे (हवेली) कृषी बाजार समितीच्या सभापती दिलीप काळभोर यांच्या विरोधात बाजार समितीच्या सदस्यांनी आणलेला अविश्वास ठराव १० विरुद्ध ० मताने बारगळल्यानंतर पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सारीका मिलिंद हरगुडे यांनी आपल्या उपसभापतीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आज (दि.१३) रोजी होणाऱ्या उपसभापतीच्या निवडणुकीसाठी कोणाच्या गटाचा विजय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सभापती विरोधी अविश्वास ठरावात अनुउपस्थित असलेल्या ८ सदस्यांनी ही निवडणूक लढविण्यासाठी हालचाली सुरू केल्याने या निवडणुकीवर हवेली तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
दरम्यान, दिड वर्षापूर्वी झालेल्या पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विकास दांगट, प्रदिप कंद, बाजार समितीचे माजी सभापती पंढरीनाथ पठारे यांच्या सह प्रकाश जगताप यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय पॅनेलने पंधरा पैकी तेरा जागांवर जिंकत विजय मिळविला होता. व्यापारी मतदारसंघात गणेश घुले, अनिरुद्ध भोसले व हमाल मतदारसंघात संतोष नांगरे हे स्वतंत्र्यरीत्या विजयी झाले होते. सर्वपक्षीय पॅनेलच्या वतीने सभापती व उपसभापती पद हे ठरावीक कालावधीसाठी विभागून घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
मात्र सभापतीपदाचा राजीनामा दिला नसल्याने बाजार समितीच्या दोन गटांत फूट पडली आहे. त्यानंतर ज्येष्ठ संचालक प्रकाश जगताप यांच्या गटाने सभापतींचे सह्यांचे अधिकार काढणे व अविश्वास ठराव आणने अशा हालचाली केल्या असल्याने, बाजार समितीच्या कारभारावरुन तालुक्याचे राजकारण हे ढवळून निघाले आहे. अशातच सारीका हरगुडे यांनी निर्धारीत वेळेत उपसभापती पदाचा राजीनामा दिल्याने आज शुक्रवार (दि.१३) रोजी उपसभा पतीपदासाठी निवडणूक होणार आहे.
या निवडणुकीसाठी सभापती दिलीपकाळभोर यांच्या विरोधात अविश्वास ठराव फेटाळला जावा म्हणून दुबई वारी केलेल्यादिलीप काळभोर गटाने या निवडणुकीत उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलेल जात आहे. या गटातून नानासाहेब आबनावे यांच्या नावाची सद्या चर्चा आहे. प्रकाश जगतापयांच्या गटाकडून दत्तात्रय पायगुडे यांच्या नावाची चर्चा असून त्यामुळे हवेली तालुक्यात या निवडणूकीमुळे काय राजकीय रंग चढणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
प्रशासकराज हटविणे भाजपच्या अंगाशी..
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती ही उत्पन्नात आशिया खंडातील सर्वात अग्रगण्य बाजार समिती म्हणून नावाजलेली आहे. या बाजार समितीवर लोण्याचा गोळा खाण्यासाठी शासनस्तरावर आपले अस्तित्व ठेवण्यासाठी वेळोवेळी तत्कालीन राज्य सरकारमधील बड्या नेतेमंडळींनी जाणीवपूर्वक लक्ष ठेवले आहे. या प्रयत्नाचाच भाग म्हणून या बाजार समितीवर गेली २२ वर्षे प्रशासक राज राहिले आहे. परंतु महायुती सरकारने प्रशासक हटवून हवेली तालुक्याची बाजार समिती म्हणून संपूर्ण कार्यक्षेत्र जाहीर केले आहे.
या बाजार समितीच्या चालू स्थितीत १८० कोटींच्या ठेवी तर ९२ कोटींचे वार्षिक उत्पन्न असून बाजार समितीच्या गुलटेकडी, मार्केटयार्ड मुख्य बाजार तसेच मांजरी, खेड शिवापूर, मोशी, उत्तमनगर हे उपबाजार आहेत. या बाजार समितीला व्यापारी गाळे व्यवसायिक वाढीसाठी अत्यंत उपयोगी असल्याने या बाजार समितीवर आपले नियंत्रण राखण्यासाठी सत्तेचा व खुर्चीचा खेळ रंगलेला दिसून येत आहे. भाजपने आपले राजकीज अस्तित्व वाढविण्यासाठी या बाजार समितीवर प्रशासकीय राज हटविले खरे, परंतु भाजपच्या हे अंगलट येतंय काय? अशी परिस्थिती दिसत आहे.