-संतोष पवार
पळसदेव : शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात असून, दोन दिवसांपुर्वी प्रवेशाची तिसरी फेरी पुर्ण झाली. तिसऱ्या फेरीअखेर देखील अभियांत्रिकीच्या तब्बल 50 हजारांपेक्षा अधिक जागा रिक्त राहिल्या आहेत. रिक्त जागांसाठी आता आणखी एक विशेष ‘ए कॅप फेरी’ होणार असून त्यानंतर उर्वरित रिक्त जागांसाठी संस्थास्तरावर प्रवेश प्रक्रिया राबवली जाणार आहे.
गतवर्षीप्रमाणे यंदाही अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात जागा रिक्त राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यात यंदा अभियांत्रिकी प्रवेशासाठी 1 लाख 64 हजार 336 जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी तिसऱ्या फेरीअखेर 1 लाख 12 हजार 981 विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहे. त्यामुळे अद्याप 51 हजार 355 जागा रिक्त राहिल्या आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा मात्र जास्तीच्या जागा रिक्त राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
गेल्या काही वर्षांपासून अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाला मिळणारा विद्यार्थ्यांचा प्रतिसाद घटला आहे. त्यामुळे निम्म्याहून अधिक जागा रिक्त राहत होत्या. मात्र, आयटी क्षेत्रातील नोकरीत मिळणारे बलाढ्य पॅकेज आणि व्यापक संधी लक्षात घेता, अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून संगणक विषयाशी निगडित शाखेच्या प्रवेश क्षमतेत सातत्याने वाढ होत होती. सद्यःस्थितीत आयटी, कॉम्प्युटर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स ॲण्ड डेटा सायन्स, कॉम्प्युटर सायन्स, सायबर सेक्युरिटी आदी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांमध्ये चढाओढ पाहायला मिळत आहे.
कॉम्प्युटर इंजिनीअरिंग आणि त्यासंबंधित शाखांना सर्वाधिक जागा असून, त्याच शाखांकडे विद्यार्थ्यांचाही अधिक कल असल्याचे दिसून येत आहे. राज्यात कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या यंदा 46 हजार 290 जागा उपलब्ध असून, तिसऱ्या फेरीअखेर त्यामध्ये 33 हजार 355 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. आर्टिफिशियल इंटेलिजन्स या नव्याने तयार झालेल्या शाखेच्या प्रवेशासाठी यंदा 18 हजार 668 जागा उपलब्ध आहे. त्यातील 13 हजार 531 जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.