वाकड : पुण्यासह पिंपरी- चिंचवड परिसरात गुन्हेगारीमध्ये वाढ होताना दिसत आहे. अंगावर चिखल उडल्याच्या कारणावरून दोघांनी मिळून एका वाहनचालकावर लोखंडी रॉड व कोयत्याने वार करून जेव्ह ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. ६) रात्री साडेअकराच्या सुमारास रहाटणीतील शिवराजनगर येथे घडली आहे.
विशाल नथू गायकवाड (वय ३०, रा. रहटणी) असे जखमीचे नाव आहे. त्यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. किशोर पांचाळ (वय-२०), करण उर्फ मुन्ना गजानन चोपवाड (वय-२४, दोघे रा. रहाटणी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गायकवाड हे दुकानासमोर टेम्पो पार्क करून मित्रांशी गप्पा मारत होते. त्यावेळी आरोपी त्या ठिकाणी आले. त्यांनी आमच्या अंगावर चिखल का उडवला, असे विचारत तुला लय माज आला आहे का, तुला आज संपवूनच टाकतो, असे म्हणत कोयत्याने वार केले. तसेच, लोखंडी रॉडने मारहाण फिर्यादीत म्हटले आहे. यामध्ये फिर्यादी गायकवाड हे गंभीर जखमी झाले आहेत. पुढील तपास फौजदार व्यंकट पोटे करत आहेत.