संतोष पवार
पळसदेव : आदिवासी विकास विभागाने शासकीय आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या देखरेखीसाठी बाह्य स्त्रोताव्दारे परिचारिकांची पदे भरण्याचा (Nurse Recruitment) निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांवर आश्रमशाळेतच प्रथमोपचार होणार असून त्यांच्या आरोग्याची निगा राखली जाणार आहे. विद्यार्थ्यांचे आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी संबंधित परिचारिकेवर राहणार आहे, अशी माहिती आदिवासी विकास विभागाच्या आयुक्त नयना गुंडे यांनी दिली आहे.
राज्यभरात आदिवासी विकास विभागाच्या ४९९ आश्रमशाळा असून, त्यामध्ये सुमारे दोन लाख विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. हे सर्व विद्यार्थी निवासी असल्याने त्यांचे आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी संबंधित मुख्याध्यापक, अधिक्षकांवर असते. दरवर्षी आश्रमशाळांना प्रथमोपचार पेटीसह औषध पुरवठा केला जातो.
मात्र, वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तीची नियुक्ती नसल्याने प्रथमोपचार करताना अडचणी येतात. आता परिचारिकांची नियुक्ती होणार असल्याने विद्यार्थ्यांना योग्य प्रथमोपचार मिळणार आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होणार आहे.
बाह्य स्त्रोत संस्थांद्वारे परिचारिका भरती करण्यासाठी आदिवासी आयुक्त कार्यालयाकडून निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी पात्र संस्थांकडून २७ सप्टेंबरपर्यंत निविदा मागवण्यात येणार आहेत. आदिवासी आयुक्तालय तसेच चारही अपर आयुक्त कार्यालयातील विविध पदांवर बाह्य स्त्रोताव्दारे नियुक्ती दिली जाणार आहे. त्यात वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे. त्यामुळे पुढील काळात आदिवासी विभागाअंतर्गत येणाऱ्या ४९९ आश्रमशाळांना परिचारिका मिळणार आहे.