पुणे : पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरचा खून करण्यासाठी आरोपींनी परराज्यातून शस्त्रे आणली होती. त्यापैकी चार पिस्तुले, दहा काडतुसे आणि सहा दुचाकी व एक चारचाकी जप्त करण्यात आली आहे. तसेच वनराजचे वडील सूर्यकांत व भाऊ शिवम यांच्यासह नऊ प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांकडे चौकशी करण्यात आली आहे, अशी माहिती तपास अधिकारी वरिष्ठ निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी सोमवारी न्यायालयात दिली आहे.
याप्रकरणात, आंदेकरची बहीण संजीवनी जयंत कोमकर (वय ४४), मेहुणे जयंत लक्ष्मण कोमकर (वय ५२) व गणेश लक्ष्मण कोमकर (वय ३७), प्रकाश लक्ष्मण कोमकर (वय ५१. सर्व रा. नाना पेठ) आणि सोमनाथ सयाजी गायकवाड (वय ४१. मूळ रा. नाना पेठ, सध्या रा. आंबेगाव पठार, धनकवडी) यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमृत बिराजदार यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते.
यावेळी न्यायालयाने त्यांच्या पोलिस कोठडीत १२ सप्टेंबरपर्यंत वाढ केली. याप्रकरणात, वनराजचे वडील बंडू ऊर्फ सूर्यकांत राणोजी आंदेकर (वय ६८. रा. नाना पेठ) यांनी समर्थ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी आतापर्यंत सोळा आरोपींना अटक केली आहे. तर तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे, तसेच आणखी चार जणांचा पोलिस शोध घेत आहेत.
न्यायालयात सरकार पक्षातर्फे युक्तिवाद करताना सहायक सरकारी वकील योगेश कदम म्हणाले की, हे आरोपी मुख्य सूत्रधार असून, संपती व वर्चस्ववादातून त्यांनी अन्य आरोपींच्या मदतीने पूर्वनियोजित कट रचून निर्वृणपणे वनराजचा खून केला आहे. त्यासाठी त्यांना पैसे, हत्यार, वाहन पुरवून गुन्ह्यात अप्रत्यक्ष सहभाग घेतलेल्या आरोपींचा शोध घ्यायचा आहे. आरोपीच्या मोबाईलची तांत्रिक तपासणी करायची आहे. गुन्ह्याच्या तपासातील प्रगती अधोरेखित करताना आरोपींच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी अॅड. कदम यांनी केली.