अंबरनाथ : राज्यात महिलांवर लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढताना दिसत आहे. बदलापूर येथील घटनेनंतर राज्यात अनेक घटना घडल्या आहेत. अशातच आता अत्याचाराच्या घटनेने अंबरनाथ हादरले आहे. एका रिक्षा चालकाने मुलीला घरी सोडण्याच्या बहाण्याने घेऊन जात अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी रिक्षा चालकास अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथमध्ये वास्तव्यास असलेली १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही अंबरनाथ पश्चिम भागातून घरी जात असताना रिक्षा चालकाने तिला घरी सोडण्याच्या बहाण्याने रिक्षात बसवलं. त्यानंतर तिला मोरिवली डम्पिंग ग्राउंडवर नेत तिच्यावर अत्याचार केला. घडल्या प्रकाराबाबत पीडित मुलीने पोलिसांकडे तक्रार केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत शिवाजीनगर पोलिसांनी लागलीच घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली.
आरोपी अटकेत..
याप्रकरणी मुलीच्या तक्रारीवरून अत्याचार आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी रिक्षा चालकाला बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली असून या घटनेचा सविस्तर तपास सुरू असल्याची माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांनी दिली आहे.