पुणे : इंदापूर पोलिसांनी एका फ्लॅटवर धाड टाकत दरोड्याच्या तयारीत असणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. त्याच्याकडून 9 सुतळी बॉम्ब, 3 पिस्टलसह अन्य शस्त्र साठा हस्तगत करण्यात आला आहे. सुयश ऊर्फ तात्या सोमनाथ घोडके असं आरोपीचं नांव आहे. याप्रकरणी आता वालचंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वालचंदनगर पोलिसांनी तब्बल नऊ बॉम्ब, तीन पिस्टल आणि तलवारी व कोयते घेऊन दरोडा टाकणाऱ्या सराईत गुन्हेगाराला सापळा रचून त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार यांनी याबाबत माहिती दिली. आरोपी सुयश ऊर्फ तात्या सोमनाथ घोडके याचा वालचंदनगर पोलीस शोध घेत होते.
आरोपी वालचंदनगर येथील अंजली बाल मंदीर क्रमांक 01 येथील कामगार वसाहतीच्या पोस्ट कॉलनी डी-3 मधील खोली क्रमांक 03 मध्ये त्याच्या मित्रांसोबत असल्याची बातमी पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे वालचंदनगर पोलिसांच्या पथकाने संबंधित खोलीवर सापळा लावून योग्य वेळ साधत आरोपीला ताब्यात घेतले.
आरोपीकडून पोलिसांनी 3 गावठी पिस्टल मॅग्झीन सहीत, एक खाली मॅग्झीन, दहा जिवंत काडतुसे (राऊंड), चौदा वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल, दोन लोखंडी कटर, एक लोखंडी तलवार, दोन लोखंडी चाकू, एक मुठ नसलेले तलवारीचे पाते आणि 9 सुतळी बॉम्ब असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.