औसा (लातूर): औसा ग्रामीण रुग्णालयात शस्त्रक्रिया करून प्रसूती केलेल्या महिलेच्या पोटात कापड निघाल्याने राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचा कारभार नेमका चालतो कसा, याचा प्रत्यय आला आहे. संबंधित महिलेच्या पतीने तक्रार करून देखील आरोग्य विभाग केवळ चौकशी समिती नेमून कागदी घोडे नाचवत असल्याचा आरोप पीडित महिलेच्या पतीने केला आहे. तीन महिने कापड महिलेच्या पोटात राहिले होते. केवळ नशीब चांगलं म्हणून ही महिला मरणाच्या दारातून परत आली आहे.
हबीबा वसीम जेवळे ही महिला १२ एप्रिल २०२४ ला प्रसूतीसाठी औसा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल झाली होती. तिचे माहेर मातोळा (ता. औसा) आहे. तर सासर मुरूम (ता. उमरगा जि. धाराशिव) आहे. तिच्यावर १३ एप्रिल रोजी शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र, बाळाचा जन्म होताच रक्त पुसण्यासाठी वापरला जाणारा कपडा (माँब) मध्येच ठेवून टाके घेण्यात आले. ही बाब कोणाच्याच निदर्शनास आली नाही. डिस्चार्ज नंतर पोटातून पाणी येत असल्याने पुन्हा ती महिला औसा ग्रामीण रुग्णालयात आली होती. पण येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला लातूरच्या शासकीय रुग्णालयात पाठविले. त्या ठिकाणीही महिलेवर जवळपास वीस दिवस उपचार करण्यात आले. मात्र, टाक्यातून पू येत असल्याने औशातील दोन खाजगी डॉक्टरांकडून उपचार घेतले. तरी देखील टाके भरून येत नसल्याने पुन्हा उमरगा येथील खाजगी रुग्णालयात दाखविले गेले. सोनोग्राफी, सीटी स्कॅन केल्यावर पोटात गाठ असल्याचे निदान झाले.
गाठ काढण्यासाठी ऑपरेशन केले असता पोटात गाठ नाही, तर चक्क दीड बाय एक फुटाचा कपडा (माँब) निघाला. हा कपडा औशाच्या ग्रामीण रुग्णालयातच राहिल्याचा आरोप महिलेसह नातेवाईकांनी केला आहे. दरम्यान सदर महिला ही प्रकृती ठोक नसल्याने जास्त वेळ एका जागेवर उभाही राहता येत नाही.