पुणे : पुण्यातील लोणीकंद परिसरात भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना शनिवारी (दि. ०८ ) मध्यरात्री रात्री सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास नगर रस्त्यावरील नगर गाडे वस्ती परिसरात घडली असून अपघातात दुचाकीस्वार तरुण जखमी झाला आहे. याप्रकरणी मोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुधांशु राज (वय-२२, रा. युनाईट पीजी हाॅस्टेल मॅजेस्टिक सिटी, वाघोली) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी वैभव रणधीर कुमार (वय २२, रा. युनाईट पीजी होस्टेल, मॅजेस्टिक सिटी, वाघोली, मूळ रा. पटणा, बिहार) यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव कुमार आणि सुधांशु राज हे वाघोली भागातील एका महाविद्यालयात शिक्षण घेतात. शनिवारी रात्री ते विमाननगर परिसरात गेले होते. रात्री उशीरा चित्रपट पाहून ते दुचाकीवरुन वाघोलीच्या दिशेने निघाले होते. जेवण करून ते घरी जाणार होते. त्यांच्याबरोबर मित्र-मैत्रिणी देखील होते.
दरम्यान, गाडे वस्ती भागातील एका फर्निचरच्या दुकानासमोर दुचाकीस्वार वैभव वळण घेत असताना भरधाव मोटारीने दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार वैभव बाजूला फेकला गेल्याने तो बचावला. तर सहप्रवासी सुधांशू गंभीर जखमी झाला. गंभीर जखमी झालेल्या सुधांशूचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. तर दुचाकीस्वार वैभव याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक घाेरपडे तपास करत आहेत.