पुणे: स्वारगेट परिसरातील सराईत गुंड कुणाला पोळ याच्या खुनाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या विशाल उर्फ जगल्या सातपुते याच्या खुनाच्या तयारीत असलेल्या सातजणांच्या टोळीला पोलिसांनी रविवारी (दि. ८) अटक करून सात पिस्तुले व २३ काडतुसे जप्त केली. ऐन गणेशोत्सवात खून करून वातावरण संवेदनशील करण्याचा कट यामुळे उधळला गेला.
शुभम ऊर्फ मॅटर अनिल जगताप (वय २७), सुमित उत्तरेश्वर जाधव (वय २६), अमित म्हस्कु अवचरे (वय २७), ओंकार ऊर्फ भैय्या अशोक जाधव (वय २४), अजय ऊर्फ सागर बाळकृष्ण हेगडे (वय २७), राज बसवराज स्वामी (वय २६), लतिकेश गौतम पोळ (वय २२) ही अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हे सर्वजण स्वारगेट व लोहियानगर परिसरात वास्तव्याला आहेत.
दहीहंडीचा कार्यक्रम संपवून परत येत असताना कोलवडी परिसरात एकावर खुनी हल्ला करण्यात आला. या पोलीस तपासात हा गुन्हा सुमित जाधव व त्याच्या साथीदारांनी केला असल्याचे उघडकीस आले. सुमित जाधव हडपसर, स्वारगेट, लोहियानगर येथील एन्जॉय ग्रुपचा सदस्य असल्याची माहिती पुढे आली. तपासात मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास करत पोलिसांनी जगल्याच्या खुनाचा प्रयत्न होणार असल्याच्या गुन्ह्याचा छडा लावला. लोणीकंद पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडित रेजितवाड, सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे व पथकाने हडपसर, मुंढवा, लोणीकंद व नवले पूल परिसरात कारवाई करत अन्य आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सात पिस्तुले व २३ काडतुसे जप्त केली.
स्वारगेट परिसरात पाच वर्षांपूर्वी कुणाल पोळ या गुंडाचा एका हॉटेलच्या दारात गोळ्या झाडून खून करण्यात आला. त्यामध्ये जगल्या मुख्य आरोपी होता. तो नुकताच जामिनावर कारागृहातून बाहेर आला आहे. पोळ याच्या खुनाचा सूड घेण्यासाठी जगल्याला उडवण्याचे कारस्थान या आरोपींनी रचले होते. मात्र, पोलिसांनी वेळीच कारवाई करून हा कट उधळला.