पुणे: आंदेकर टोळीने गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात सोमनाथ गायकवाड टोळीतील सदस्य निखिल आखाडेचा खून केला होता. या खुनाचा बदला वर्षभरातच घेण्याची शपथ सोमनाथ गायकवाड याने घेतली होती. त्याच्या खुनाला वर्ष होण्याअगोदरच गायकवाडने वनराज आंदेकरचा खून करून बदला घेतला. पोलिसांच्या तपासात गायकवाड याने ‘आंदेकरला वर्षभरातच ठोकायचे होते, त्याप्रमाणे आम्ही ठोकून दाखवले,’ अशी कबुली दिली.
सोमनाथ गायकवाड हा आंदेकर टोळीचाच सदस्य होता. मात्र, काही वर्षांपासून टोळीतून फुटून त्याने स्वतःची टोळी निर्माण केली. यानंतर दोन्ही टोळ्यांत धुसफूस सुरू झाली. सोमनाथ डोईजड जायला लागल्यावर आंदेकर टोळीने ३ ऑक्टोबर २०२३ रोजी त्याचा विश्वासू साथीदार निखिल आखाडेचा भर रस्त्यात चाकू आणि स्कू ड्रायव्हरने भोसकून खून केला. हा खून गायकवाडच्या खूपच जिव्हारी लागला होता. तेव्हा अनिकेत दुधभातेवरही गंभीर वार झाले होते. या गुन्ह्यात सूर्यकांत ऊर्फ बंडू आण्णा रोणीजी आंदेकर, कृष्णराज ऊर्फ कृष्णा सूर्यकांत आंदेकर आणि त्यांच्या साथीदारांना अटक झाली. यानंतर दोन्ही टोळ्यांतील वैमनस्य वाढतच गेले. तेव्हाच सोमनाथ गायकवाडने आपल्या साथीदाराच्या खुनाचा वर्षभरात बदला घेण्याची शपथच घेतली होती.
दरम्यान, आंदेकर टोळीतील सदस्य सोमनाथ आणि त्याच्या टोळीतील सदस्यांना नेहमी टपकावण्याची धमकी देत होते. यामुळे आपल्याला जिवंत राहायचे असेल, तर आंदेकर टोळीला संपवलेच पाहिजे ही बाब गायकवाडच्या टोळीच्या लक्षात आली. यामुळे गायकवाड योग्य त्या संधीच्या शोधात होता. ही संधी त्याला कोमकर कुटुंबाच्या साथीने मिळाली. गायकवाडने पोलिसांना सागितले की, आंदेकर टोळीला संपवले, तर मी मोठा होणार होतो. यामुळेही वनराज आंदेकरचा खून करणे महत्त्वाचे होते. यामुळे मागील एक ते दीड महिन्यापासून त्याच्या हालचालीवर लक्ष ठेवून होतो.