पुणे : गणेशोत्सवकाळात खबरदारी म्हणून पुणे शहरात मद्यविक्रीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शनिवारी गणेश आगमनाच्या दिवशी आणि १७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीच्या दिवशी पुणे, पिंपरी- चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागात मद्यविक्री बंद असणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी शुक्रवारी दिले आहेत.
गणेश विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच १८ सप्टेंबर रोजी पुणे शहरातील विसर्जन मिरवणूक मार्गावरील मद्यविक्रीची दुकाने, मद्यालये ही विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. गणेशोत्सवाच्या पाचव्या आणि सातव्या दिवशी (दि. ११ आणि १३ सप्टेंबर) गणेश विसर्जन होणाऱ्या परिसरातील मिरवणूक मार्गावरील सर्व मद्यविक्री दुकाने, मद्यालये बंद ठेवण्यात येणार आहेत.
तसेच शहरातील खडक, विश्रामबाग आणि फरासखाना पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील मद्यविक्री दुकाने, मद्यालये ही संपूर्ण गणेशोत्सव काळात म्हणजेच ७ ते १७ सप्टेंबर आणि १८ सप्टेंबर रोजी विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत बंद राहणार आहेत, असे आदेशात म्हटले आहे.