अक्षय टेमगिरे
रांजणगाव गणपती : शिरूर तालुक्यातील कासारी येथील एका भामट्याने आपल्या मित्राला कंपनीमध्ये बिजनेस करुन देण्याच्या बहाण्याने तब्बल १० लाख ५१ हजारांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश तुकाराम नेवसे (रा. कासारी, ता. शिरुर) असं गुन्हा दाखल केलेल्या भामट्याचे नाव आहे. याप्रकरणी महेश राजेंद्र भुजबळ (वय-३३ वर्षे, रा. कासारी, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी निलेश नेवसे हा तरुण चाकण येथील एका कंपनीत कामाला आहे. त्याने गावातील महेश भुजबळ या मित्राला विश्वासात घेत मी काम करत असलेल्या कंपनीमध्ये वेगवेगळे साहित्य तू पूरव तुला पैसे भेटतील असे सांगितले. निलेशने कंपनीच्या एका फॉर्मवर महेशच्या सह्या घेतल्या.
त्यांनतर कंपनीच्या मेल आयडी वरून महेशला वेगवेगळ्या वस्तूंची पर्चेस यादी पाठवून त्यासाठी लागणारे पैसे मागवून घेतले. चार महिन्यात१० लाख ५१ हजार रुपये वेगवेगळ्या मटेरियलसाठी पाठवले. तरीही चार महिने झाले तरी महेशला कंपनीकडून काही रक्कम मिळाली नसल्याने त्याने निलेशकडे विचारपूस केली. यावेळी निलेशने महेशला मिळतील असा विश्वास दिला.
दरम्यान, महेश यांनी कंपनीमध्ये जाऊन चौकशी केली असता कंपनीनेच निलेश नेवसे याच्यावर फसवणूक केल्याबाबत पोलिसांत तक्रार केल्याचे समोर आले, त्यावेळी महेश यांनी कंपनीच्या मेलवरून आलेल्या पर्चेस ऑर्डरबाबत चौकशी केली असता निलेश याने बनावट ऑर्डर पाठवल्याचे दिसून आले. कंपनीकडे यांच्याकडील काहीही साहित्य आले नसल्याचे निदर्शनास आल्याने, आपल्याच मित्राने आपली लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले.
शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी निलेश नेवसे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक रोहिणी सोनावले करत आहेत.