-बापू मुळीक
सासवड : सासवड व जेजुरी शहराला नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी नव्याने योजना आखण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे केली होती. या मागणीला मोठे यश आले असून याबाबतचे मंजुरी आदेश नुकतेच काढण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी नगरोत्थान योजनेतून या कामांसाठी सासवडला 142 कोटी 86 लाख तर जेजुरीला 77 कोटी 53 लाख रुपयांना मंजुरी दिली असल्याची माहिती, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे दिली आहे. सासवड येथे ते पत्रकारांशी बोलत होते.
पुढे बोलताना शिवतारे म्हणाले, सासवड व जेजुरी शहराला मागील अनेक वर्ष दिवसाआड किंवा तीन तीन दिवसांनी पाणीपुरवठा होतो. त्यावर उपाययोजना करणे आवश्यक होते. याबाबत दोन्ही नगरपालिकांच्या मुख्याधिकारी यांना विश्वासात घेऊन उपाय काढण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार या योजना प्रस्तावित केल्या होत्या. नव्या योजनेच्या पूर्णत्वानंतर शहराला दररोज पाणी मिळावे, अशी इच्छा आहे. त्या अनुरुपच ही योजना आखलेली असून त्याबाबत आज सासवड नगरपालिकेला प्रत्यक्ष भेट देऊन मुख्याधिकारी कैलास चव्हाण यांच्याशी चर्चा केली. काम दर्जेदार आणि लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी शक्य तितक्या लवकर टेंडर काढावे, अशा सूचना त्यांना दिल्या आहे. दोन्ही शहरातील नागरिकांना गणेश उत्सवाच्या निमित्ताने मुख्यमंत्री महोदयांनी एक आगळी वेगळी भेट दिली आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार या सर्वांचे शिवतारे यांनी आभार मानले.
यावेळी शिवतारे यांच्या सोबत जिल्हाप्रमुख दिलीप आबा यादव, नगरसेवक सचिन भोंगळे, अस्मिता रणपिसे, युवासेनेचे मंदार गिरमे, राजेश दळवी, विद्या टिळेकर, शहरप्रमुख मिलिंद इनामके, राजू शिंदे, धनंजय म्हेत्रे, मंगेश भिंतडे, अविनाश बडदे, सूरज जगताप, रोहित ताम्हणे, नटराज खेडेकर, सचिन देशमुख, सूरज माने, राष्ट्रवादी महाराष्ट्र प्रदेशसोशल मीडियाचे संतोष कोलते, श्रीकांत टिळेकर, अंकुर शिवरकर, चंद्रकांत जगताप, ओंकार जगताप, श्रीजय जाधव इ. उपस्थित होते.