पुणे : राज्यात पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढला असून आज शुक्रवारी मुंबई आणि ठाण्यात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात सुद्धा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच पुण्यासह संपूर्ण कोकणाला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार असल्यामुळे पर्यटकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. सलग चार ते पाच दिवस पावसाने मुक्काम केल्याने धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असला तरी मुसळधार पावसाने झोडपल्याने खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांचा उर दाटून आला आहे.
सरकारने तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे. या पावसाचा फटका सहन करत असतानाच भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे.
‘या’ भागात पावसाचा इशारा..
भारतीय हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार, आज मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड परभणी, लातूर, तसेच धाराशिव जिल्ह्याचा समावेश आहे. बीड जिल्ह्यातही हलक्या पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे विदर्भातील, अकोला, अमरावती, नागपूर, बुलढाणा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आलाय. मुंबईसह उपनगरातही आज शुक्रवारी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे आणि ठाण्यासह संपूर्ण कोकणाला आज पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. नवी मुंबई आणि उर्वरित भागात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.