मावळ : राज्यात सद्या पावसाचा जोर वाढला असून पाणी साठ्यातही वाढ झाली आहे. त्यामुळे पर्यटक वर्षा सहलीसाठी निसर्गाच्या सानिध्यात जात असतात. अशा वेळी प्रसाशनाकडून काळजी घेण्याचे आवाहन केलेले असते. परंतु अशातच मावळमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. मावळधील इंद्रायणी नदीवर असलेल्या कुंडमळा परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या मित्रांमधील दोन जण वाहून गेल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर घटनास्थळी एमआयडीसी तळेगाव पोलीस तसेच शोधकार्यासाठी वन्यजीव रक्षक टीम दाखल झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चिंचवड गाव येथील श्रेया सुरेश गावडे (वय १७) आणि रोहन ज्ञानेशवर ढोंबरे (वय २२) असे वाहून गेलेल्या तरुण तरुणीचे नाव आहे. श्रेया व रोहन यांच्यासह सात ते आठ मित्र मावळातील कुंडमळा परिसरात फिरण्यासाठी गेले होते. दरम्यान हे सर्वजण कुंडमळ्याच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरले होते. त्यातील श्रेया व रोहन याना पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघे वाहून गेले. सोबत असलेल्या मित्रांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु अपयश आले. यावेळी सर्व मित्रांनी आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिक धावून आले होते.
सदर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर तळेगाव आंबी एमआयडीसी पोलीस आणि मावळ वन्यजीव रक्षक बचाव पथक घटनास्थळी पोहचून शोधकार्य सुरू केलं आहे. एकीकडे प्रशासनाने इंद्रायणी नदीच्या पाण्यात उतरण्यास मनाई केली असताना ही पर्यटक अश्या पध्दतीने आपला जीव धोक्यात टाकून पाण्यात उतरत आहे. त्यामुळे अशा दुर्दवी घटनांना आमंत्रण मिळते.