कल्याण : गणरायाचे आगमन अगदी दोन दिवसांवर आले आहे. भक्तगण बाप्पाच्या भक्तीत पार तल्लीन झाले आहे. अशातच कशेडी घाटात गावाकडे कोकणात निघालेल्या दोन बसचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. बाईकला वाचवण्यासाठी कंटेनरने अचानक ब्रेक मारल्यामुळे प्रवाशांनी फुल भरलेल्या दोन बस एकमेकांवर आदळल्या आहेत. सुदैवाने कोणतीही दुखापत झाली नसून दोन्ही बसचे मात्र नुकसान झाले आहे. या दोन्ही बसमध्ये एकूण 80 प्रवासी होते.
गणेशोत्सव सणाला अवघे दोन दिवस शिल्लक राहिलेले आहे. मुंबईकर चाकरमानी लाखोंच्या संख्येने कोकणाकडे येण्यासाठी निघाले आहेत. मात्र, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर माणगाव ते लानेरे या दहा किलोमीटरच्या परिसरामध्ये वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. मुंबईकर चाकरणान्यांना या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
अपघाताची माहिती मिळताच खेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. अपघातग्रस्त बसमधील प्रवाशांना दुसऱ्या बसमधून रवाना करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.