पुणे : गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही विभागाला पावसाने झोडपून काढले आहे. गेल्या अडीच महिन्यापासून दडी मारलेल्या पावसाने अवघ्या एका आठवड्यातच बॅकलॉग भरुन काढला. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आजही राज्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.
हवामान विभागाने आज विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या भागात मोठ्या आणि मध्यम पावसाचा इशारा दिला आहे. कोकणात मात्र पावसाच्या या सरींचं प्रमाण कमी असलं तरीही त्यांचा जोर मात्र वाढला आहे. आज विदर्भातील गडचिरोली, अकोला, अमरवती, नागपूर, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ आणि नाशिक जिल्ह्यात मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काही भागाला पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील तीन ते चार दिवस मुंबईला सरत्या पावसाच्या सरींची बरसात अनुभवता येणार आहे. सध्या बंगालच्या उपसागरासह नजीकच्या भागामध्ये कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळं शहराच्या बहुतांश भागांवर काळ्या ढगांची चादर आहे. वाऱ्यांनी वेग घत सध्या दिशा बदलल्यामुळं मुंबईत आता विरामानंच पावसाच्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, राज्यात सध्या बेफाम पाऊस झाल्याने नागरिकांची दाणादाण उडाली आहे. विदर्भासह मराठवाडयात पावसानं हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली आहे. त्यामुळं अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून जनजीवन विस्कळीत झालं आहे.