पुणे : पुण्यातील छत्रपती राजाराम मंडळ दरवर्षी गणेशोत्सवात देशातील वैशिष्ट्यपूर्ण मंदिरे भव्य हुबेहूब साकारत असते. यावर्षी देखील मंडळाच्या वतीने यंदा अमृतसर येथील सुवर्ण मंदिराची प्रतिकृती उभारण्यात येत आहे. शीख समुदायाचे संत गुरुनानक यांच्या 555 व्या जयंतीनिमित आणि महाराष्ट्र व पंजाब यांच्या संस्कृती व परंपराची माहिती व्हावी, या उद्देशाने यंदा सुवर्ण मंदिर साकारण्यात येत आहे.
मात्र अमृतसर येथील सुवर्ण मंदिराची प्रतिकृती उभारल्याने पुण्यातील छत्रपती राजाराम मंडळ आता अडचणीत आले आहे. शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट हरजिंदर सिंग धामी यांनी यावर ट्विट करत आक्षेप घेतला आहे. हे शीखांच्या भावना भडकवणारे कृत्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
धामी म्हणाले की, पुणे शीख संगत यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील कॅम्प परिसरात हा पंडाल गणपती पूजेसाठी बांधण्यात आला आहे, जो श्री हरमंदर साहिबच्या धर्तीवर आहे. पुण्याच्या शीख संगतीच्या मते, शहरातील गुरुद्वारा गुरुनानक दरबार कॅम्प परिसराची व्यवस्थापन समिती या कामात अग्रेसर भूमिका बजावत आहे, जे अधिक क्लेशदायक आहे.
पुढे बोलताना म्हणाले की, काही लोक जाणूनबुजून ऐतिहासिक शीख पवित्र स्थळांची प्रतिकृती तयार करतात, ज्यामुळे समुदायाच्या धार्मिक भावना दुखावतात. ही कारवाई शीख परंपरा, चालीरीती आणि तत्त्वांच्या विरोधात आहे आणि धार्मिक भावना दुखावल्या आहेत, असं धामी यांनी म्हंटल आहे.
पुढे म्हणाले की, श्री हरमंदर साहिबची प्रतिकृती बनवता येणार नाही. ज्यांनी हे केले त्यांना शीख परंपरा, श्रद्धा आणि समाजाच्या भावना समजून घ्यायला हव्या होत्या. या संदर्भात एसजीपीसी तपासासाठी एक पथक पुण्याला पाठवत आहे. त्यांनी सध्याच्या काळात अशा शीखविरोधी कारवायांबद्दल चिंता व्यक्त केली आणि स्थानिक गुरुद्वारा समित्यांना असे उपक्रम जागेवरच थांबवण्याचा प्रयत्न करावा आणि त्यात सहभागी होऊ नये असे सांगितले.
या प्रकरणाची चौकशी केली जाईल आणि गुरुद्वारा समितीही दोषी आढळल्यास पुढील कारवाईसाठी अकाल तख्त साहिबशी संपर्क साधला जाईल, असे अधिवक्ता धामी यांनी सांगितले. अशा बाबी तत्काळ शीख संघटनाच्या निदर्शनास आणून द्याव्यात, असे आवाहनही त्यांनी शीख संघटनेला केले आहे.