मुंबई: आयपीएल 2025 च्या मेगा लिलावापूर्वी एक असा खेळाडू आहे, जो सर्वाधिक चर्चेत आहे. हा दुसरा कोणी नसून टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आहे. त्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे गेल्या मोसमात झालेला कर्णधारपदाचा वाद. हार्दिक पांड्या आणि रोहित शर्मा यांच्यात जे काही घडले, त्यानंतर रोहित शर्मा यावेळी मुंबई इंडियन्समध्ये राहणार की दुसऱ्या संघात जाणार, हे जाणून घेण्यासाठी चाहत्यांना उत्सुकता आहे.
गेल्या मोसमापासून, रोहित मुंबई सोडून दुसऱ्या संघात सामील होणार असल्याच्या अनेक बातम्या समोर येत आहेत. मात्र, आता त्याच्याबाबत नवा दावा करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, फ्रँचायझीसोबतचे त्याचे सर्व वाद मिटले आहेत. नीता अंबानी यांच्या फ्रँचायझीने आपल्या माजी कर्णधाराला कायम ठेवण्यास मान्यता दिली आहे. रोहितनेही निर्णय घेतला आहे की, तो मुंबईतच राहणार आहे. मात्र, अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
रोहितबद्दल काय म्हणाले मुंबई इंडियन्स?
आयपीएल 2024 च्या अगदी आधी, मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सचा तत्कालीन कर्णधार हार्दिक पंड्याला ट्रेडद्वारे संघात समाविष्ट केले होते. यासाठी फ्रँचायझीने मोठी रक्कम भरली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबईने 100 कोटी रुपये ट्रान्सफर फी भरली होती. मात्र, याला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.
यानंतर फ्रँचायझीने अचानक पांड्याला संघाचा कर्णधार बनवल्याने चाहते चांगलेच संतापले. इथूनच रोहितसोबतचा वाद सुरू झाला. मात्र, ताज्या अहवालात सर्व वाद मिटल्याचे सांगण्यात आले आहे. रोहित शर्मा या कुटुंबातील महत्त्वाचा सदस्य असून ते त्याला कायम ठेवण्यास तयार असल्याचे मुंबईने म्हटले आहे.
रोहित शर्मा पुन्हा कर्णधार होणार?
रोहित शर्माला 2013 मध्ये मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद मिळाले. कर्णधार होताच त्याने ट्रॉफी जिंकली. यानंतर त्याने 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्येही मुंबईला चॅम्पियन बनवले. तथापि, पुढील 3 वर्षे तो पुन्हा आयपीएल ट्रॉफी जिंकण्यात अपयशी ठरला, त्यानंतर त्याने कर्णधारपद गमावले.
त्याला 2022 मध्ये टीम इंडियाचे कर्णधारपद मिळाले, त्यानंतर टीम इंडियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि 2023 एकदिवसीय वर्ल्ड कपची फायनल खेळली. 2024 चा T20 विश्वचषक जिंकला. आता असा दावा केला जात आहे की, या मोठ्या यशानंतर मुंबई कदाचित त्याला कायम ठेवेल. पण पुढच्या मोसमात त्याला कर्णधार बनवणार नाही. फक्त हार्दिक पांड्या संघाचे नेतृत्व करेल.