मुंबई: टीम इंडियाच्या नव्या निवडकर्त्याची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयने माजी यष्टीरक्षक अजय रात्राची पुरुष निवड समितीमध्ये समावेश केला आहे. बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीने मंगळवारी निर्णय घेतला की, अजय रात्रा टीम इंडियाच्या निवड समितीचे नवे सदस्य असतील. आता ते मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्यासोबत टीम इंडियाची निवड करणार आहेत. सलील अंकोला यांची जागा अजय रात्रा यांनी घेतली आहे.
अजय रात्रा यांच्याकडे प्रचंड अनुभव
अजय रात्रा यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेटसोबतच देशांतर्गत क्रिकेटचाही चांगला अनुभव आहे. ते आसाम, पंजाब आणि उत्तर प्रदेशचे मुख्य प्रशिक्षक राहिले आहेत. त्यांनी 2023 मध्ये टीम इंडियासोबतही काम केले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत ते टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये होते.
अजय रात्रा यांची कारकीर्द
अजय रात्रा यांनी 19 जानेवारी 2002 रोजी टीम इंडियासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले, त्यांनी इंग्लंडविरुद्ध पहिला सामना खेळला. त्यांनी 19 एप्रिल रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळला. मात्र, रात्राची आंतरराष्ट्रीय कारकीर्द 9 महिन्यांतच संपुष्टात आली. अजय रात्रा यांनी 6 कसोटीत 18.11 च्या सरासरीने 163 धावा केल्या होत्या आणि आपल्या बॅटने शतक केले होते. वयाच्या 20 व्या वर्षी कसोटी शतक झळकावले आणि भारतासाठी कसोटी शतक झळकावणारे सर्वात तरुण यष्टीरक्षक ठरले. याशिवाय रात्रा एकदिवसीय क्रिकेटमध्ये 12 सामने खेळले आणि या सामन्यांमध्ये केवळ 90 धावा करता आल्या. अजय रात्रा यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी संपली.
दुखापतीमुळे अजय रात्रा यांची कारकीर्द संपुष्टात
2002 मध्येच अजय रात्रा यांना दुखापत झाली होती, त्यानंतर ते टीम इंडियातून बाहेर झाले होते. पार्थिव पटेलने त्यांची जागा घेतली आणि तो कसोटी क्रिकेटमधील सर्वात तरुण क्रिकेटर बनला. यानंतर रात्रा कधीही टीम इंडियामध्ये परत येऊ शकले नाहीत. पार्थिवनंतर दिनेश कार्तिक आणि त्यानंतर एमएस धोनीने संघात स्थान मिळवले आणि रात्राची कारकीर्द केवळ 18 आंतरराष्ट्रीय सामन्यांपुरती मर्यादित राहिली.