-युनूस तांबोळी
शिरूर : केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून वीज, आरोग्य, रस्ते यासारख्या विविध विकासाच्या योजना सर्वसामान्यांसाठी राबवित आहोत. भविष्यात राज्यातील विविध प्रश्न सोडविण्यासाठी विधानसभेत पुर्ण ताकतीने लढावे लागणार आहे. जातीपातीच्या आधारावर राजकारण केल्यावर मोठी समस्या निर्माण होणार आहे. यासाठी गावचा विकास करत असताना सर्व समाजाने संघटीत होऊन एकत्रित राहण्याचे आवाहन सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.
शिरुर तालुक्यातील पश्चिम भागातील टाकळी हाजी गणात गावभेट दौरा, विविध विकासकामांचे भुमीपूजन, उद्धाटने त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार पोपटराव गावडे होते. यावेळी भीमाशंकर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदिप वळसे पाटील, शिरूर आंबेगाव विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, माजी सभापती प्रकाश पवार, राजेंद्र गावडे, सरपंच दत्ता जोरी, शिल्पा निचीत, बिपिन थिटे, राजेंद्र दाभाडे, माधुरी थोरात, शशिकला घोडे, हरीभाऊ सरोदे, शुभांगी पडवळ आदी मान्यवर उपस्थित होते.
नवऱ्याच्या पाठोपाठ मुले देखील व्यसनी…
साहेब…शिरूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात दारूधंदे फोफावले आहेत. नवरा व्यसनाच्या आहारी गेला आहे पण आता संसाराचा आधार असलेला मुलगा देखील नशा करू लागला आहे. काही करा या धंद्याचा बंदोबस्त करा. नाहीतर येथील महिला सुरक्षित राहणार नाही. आमचा संसारच उद्धवस्त होईल. अशा नाराजीच्या प्रतिक्रिया पिंपरखेड ( ता. शिरूर ) येथील महिला वर्गातून व्यक्त झाल्या. त्यावेळी या बाबत लवकरच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून येथील दारुधंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात येईल, असे वळसे पाटील यांनी सांगितले.
पुढे बोलताना वळसे पाटील म्हणाले की, नाशिक महामार्ग ते निरगुडसर- पारगाव, पिंपरखेड, जांबूत, टाकळी हाजी, मलठण मार्गे शिक्रापूर या रस्त्यासाठी 416 कोटी रूपयांचा निधी टाकून 69 किमी रस्त्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यातून या परिसरात विकासाला गती मिळणार आहे. वीज समस्येवर उपाय म्हणून सोलर चा वापर तसेच साडेसात हाऊसपावर विद्युत मोटारींना विज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुलींना मोफत शिक्षण तर लाडकी बहिण योजनेतून प्रत्येक महिन्याला बहिंनीना 1500 रूपये मिळू लागले आहेत. मागील काळात आंबेगाव शिरूर मधून बिबट्याने 47 नागरिकांवर हल्ले केले आहे. त्यामुळे बिबट्या हल्ला ही समस्या महत्त्वाची असून बिबट्या प्रजननावर नियंत्रण आणण्याचे काम करण्यात येईल.
निवडणुकीत “हऱ्या नाऱ्यांना” जागा दाखवा…
सर्वसामान्य जनतेचे हित लक्षात घेऊन विविध योजनांच्या माध्यमातून विकासाची गंगा सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या भागात आणली आहे. त्यामुळे शेतीला पाणी, विजे सारख्या समस्या सुटण्यास मदत होत आहे. धरणांच्या पाण्यामुळे डाळींब, कांदा, ऊसासारखे पिक भरघोस प्रमाणात येऊ लागले आहे. डिंभे कालव्यात बोगदा झाला तर नंदनवन झालेली शेती उध्वस्त होईल. आपल्या हक्काचे पाणी सुरक्षित ठेवण्यासाठी भविष्यात विधानसभेच्या निवडणुकीत येणारे “हऱ्या नाऱ्यांना” जागा दाखवा, असे माजी आमदार पोपटराव गावडे यांनी सांगितले.