पिंपरी : पिंपरी शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. काही वर्षांच्या प्रेमसंबंधानंतरही लग्न करण्यास नकार दिल्याने १९ वर्षीय तरुणीने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना ३१ ऑगस्ट रोजी ४ वाजण्याच्या सुमारास राहत्या घरात घडली आहे. या प्रकरणी तरुणीचे वडील कैलास मुरलीधर गायकवाड (वय-४०, रा. हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.
त्यावरून सुबोध सुधीर साखरे (वय-२५, रा. साखरे वस्ती, हिंजवडी, ता. मुळशी) आणि रोहन सुदाम पारखी (वय-३०, रा. मुलानी वस्ती, मान, ता. मुळशी) यांना अटक करण्यात आली आहे. तसेच यांची आई आणि एका महिलेवर हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या १९ वर्षाच्या मुलीचे सुबोध साखरे याच्याबरोबर मागील काही वर्षांपासून प्रेम होते. तिला सुबोध बरोबर लग्न करायचे होते. त्यामुळे फिर्यादी यांच्या मुलीने सुबोधला माझ्याशी लग्न कर असा तगादा लावला होता. मात्र, सुबोध आणि त्याच्या नातेवाईकांनी लग्नाला नकार देऊन, काहीही झाले तरी लग्न लावून द्यायचे नाही असे ठरविले होते. त्यामुळे फिर्यादी यांची मुलगी डिप्रेशनमध्ये आली होती.
दरम्यान, मुलगी आपलं लग्न सुबोधशी होणार नाही, या मानसिक तणावामुळे दडपणाखाली येऊन तिने राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक झोल करीत आहेत.