विजय लोखंडे
वाघोली : श्री क्षेत्र वाडेबोल्हाई (ता. हवेली) येथे सोमवती अमावस्येनिमित्त सालाबादप्रमाणे आज २ सप्टेंबर रोजी ग्रामस्थांनी बोल्हाई देवीची पालखी मुळा मुठा नदीला नेवून देवीला स्नान घालण्यात आले. यामध्ये सकाळी बोल्हाई मंदिरातून पालखी वाजतगाजत काढून बोल्हाई देवी पालखी मार्ग रस्त्याने शिंदेवस्ती, भोरडेवस्ती, वाडेगाव येथील भैरवनाथ, मारुती मंदिरापासून ग्रामपंचायत चौकात आली. यावेळी पालखीचे दर्शन ग्रामस्थांनी घेतले. याप्रसंगी बोल्हाई देवस्थानचे पदाधिकारी, सभासद, देवीचे पुजारी, ग्रामस्थ पालखीसोबत उपस्थित होते.
त्यानंतर पुन्हा पालखी भोरवस्ती, नाहेर वस्ती मार्गे मुळा-मुठा नदीत नेवून तेथे देवीला स्नान घालून पुन्हा पालखी वाडेगाव येथील मारुती मंदिरात आणून तेथे बोल्हाई देवी देवस्थान व ग्रामस्थांच्या वतीने अन्नदानाचा महाप्रसाद देण्यात आला. तर पुढे पालखी बोल्हाई देवी मंदिरात नेण्यात आली. याप्रसंगी पालखी सोबत असलेल्या ग्रामस्थ, भाविकांनी तिरसुळ नाचवले तर देवीचा गजर करीत पालखी स्नान घालण्यात आले.
पालखी मार्ग रस्त्याची दुरवस्था : माजी आदर्श सरपंच दिपक गावडे
यावेळी बोलताना माजी आदर्श सरपंच दिपक गावडे म्हणाले कि, बोल्हाई देवीच्या पालखी मार्गाची दुरवस्था झाली असून या रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी खड्डे पडले आहेत. तसेच शिंदे वस्ती येथे असलेल्या तलावावरील पुलाचे दर्जेदार काम झाले पाहिजे. पुलावरून जाताना वाहनचालक जीव मुठीत घेऊन वाहन चालवतात.
काही दिवसापूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्याकडे या संपूर्ण ७ किलो मीटर पालखी मार्गाचे नूतनीकरण व्हावे यासाठी कागदपत्रे सादर करून वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. मात्र, त्याकडे सार्वजनिक बांधकाम दुर्लक्ष करत आहे .येथून देवीची पालखी नेतात व ग्रामस्थांना प्रवास करताना याचा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याची दखल घेऊन शासकीय निधीतून येथे बांधकाम अभियंत्यांनी लक्ष घालून या बोल्हाई देवी पालखी रस्त्याचे संपूर्ण नूतनीकरण करावे.