शिरवळ : गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिला आणि मुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचार तसेच विनयभंगाच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. बदलापूर आणि कोलकत्ता येथील घटनेमुळे तर प्रत्येकाच्या मस्तकात तिडीक गेली आणि त्याचा रोष संबध देशाने पाहिला आहे.
अशातच आता शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका ठिकाणी दहावीत शिकणाऱ्या मुलीचा विनभंग केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना 29 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी आरोपी विरोधात शिरवळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशोक शिवाप्पा चलवादी असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार असल्याने हे कुटुंब मुलींना फिरायला घेवून पुण्याला गेले होते. रात्री घरी आल्यानंतर पप्पा मला खूप भीती वाटतेय, असे पीडित मुलगी वडिलांना म्हणाली. यानंतर वडिलांनी काय झाले, असे विचारले असता तिने संपूर्ण घटना वडिलांना सांगितली. 29 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी एकटी क्लासला कॅनॉलवरून जात असताना आशोक शिवाप्पा चलवादी याने पीडितेचा विनयभंग केला.
या प्रकारानंतर पीडित मुलीला खूप त्रास होत असल्याने तिने याबाबत वडिलांना सांगितले. अखेर 2 सप्टेंबरला येथील एका कंपनीच्या गेटवर जावून पीडितेच्या वडिलांनी संशयित आरोपी आशोक चलवादी याला बाहेर बोलावून घेत त्याला सोबत घेवून थेट शिरवळ पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर संशयित आरोपी आशोक शिवाप्पा चलवादी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शिरवळ पोलीस करत आहेत.