पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्या प्रकरणामुळे पुण्यात खळबळ माजली आहे. या प्रकरणात पुणे पोलिसांनी वनराज आंदेकर यांच्या दोन सख्ख्या बहिणी आणि दोन मेहुण्यांना अटक केली आहे. आतापर्यंत या प्रकरणात समर्थ पोलीसांनी 10 ते 12 आरोपींची ओळख पटवली असून काही जणांना अटक केली आहे.
पुणे पोलिसांनी वनराज आंदेकर यांचे मेहुणे जयंत कोमकर, गणेश कोमकर आणि बहिणी संजीवनी कोमकर आणि कल्याणी कोमकर यांना अटक केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर रविवारी रात्री नानापेठ येथील डोके तालीम परिसरात गोळीबार करुन त्यांच्यावर कोयत्याने वार करण्यात आला. हत्या झाल्यानंतर आंदेकर यांच्या नातेवाईंकांवर खुनाचा संशय व्यक्त होत होता. आता आंदेकरांच्या वडिलांनी त्यांच्याच मुलींविरोधात केलेल्या तक्रारीनंतर पोलीसांनी ही अटक कारवाई सुरु केली आहे.
दरम्यान, रविवारी झालेल्या वनराज आंदेकर हत्या प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेत. त्यात एकूण 12 हल्लेखोर चार ते पाच गाड्यांवर आल्याचे दिसून येत आहे. गाडीवरुन उतरताच वनराज आंदेकर यांच्या दिशेने त्यांनी गोळीबार सुरु केला. वनराज आंदेकर जखमी होताच हल्लेखोरांनी घटनास्थळावरुन पळ काढला.
नेमकं प्रकरण काय…?
आरोपींचे रविवार (दि. 1 सप्टेंबर) रोजी आकाश परदेशी याच्याशी काही कारणांवरुन वाद झाले होते. या संदर्भात आरोपी तक्रार देण्याकरीता समर्थ पोलीस ठाण्यात गेले होते. त्यावेळी शिवम आंदेकर व वनराज आंदेकर हे देखील पोलीस ठाण्यात पोहोचले. तेथे आरोपी संजीवनी व जयंत कोमकर यांनी आकाश परदेशीला मारहाण केली. हे भांडण शिवम आंदेकर यांनी सोडवले. त्यावेळी बहिण संजीवनी हिने भाऊ वनराज आंदेकर यांना ‘वनराज… आम्ही तुला जगु देणार नाही. तु आमच्यामध्ये आला आहेस. तु आमचे दुकान पाडण्यास सांगुन आमच्या पोटावर पाय देतोस काय? तुला आज पोर बोलावुन ठोकतेच.’ अशी धमकी दिली. आणि त्यानंतर वनराज यांच्यावर हल्ला झाला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.