पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर रविवारी सायंकाळी गोळीबार करुन त्यांच्यावर कोयत्याने वार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रात्री उशिरा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या हल्ल्यामागे दुसरा तिसरा व्यक्ती नसून वनराज आंदेकर यांची सख्खी बहिण आणि मेव्हणा जयंत कोमकर असल्याची माहिती समोर आली आहे.
वनराजचे वडील हे वडील बंडू उर्फ सूर्यकांत आंदेकर. तर, आरोपी संजीवनी कोमकर ही त्यांची मुलगी आहे आणि जयंत कोमकर हा जावई आहे.
या कारणावरुन झाला होता वाद…
आरोपींचे रविवार (दि. 1 सप्टेंबर) रोजी आकाश परदेशी याच्याशी काही कारणांवरुन वाद झाले होते. या संदर्भात आरोपी तक्रार देण्याकरीता समर्थ पोलीस ठाण्यात गेले होते. त्यावेळी शिवम आंदेकर व वनराज आंदेकर हे देखील पोलीस ठाण्यात पोहोचले. तेथे आरोपी संजीवनी व जयंत कोमकर यांनी आकाश परदेशीला मारहाण केली. हे भांडण शिवम आंदेकर यांनी सोडवले. त्यावेळी बहिण संजीवनी हिने भाऊ वनराज आंदेकर यांना ‘वनराज… आम्ही तुला जगु देणार नाही. तु आमच्यामध्ये आला आहेस. तु आमचे दुकान पाडण्यास सांगुन आमच्या पोटावर पाय देतोस काय? तुला आज पोर बोलावुन ठोकतेच.’ अशी धमकी दिली. आणि त्यानंतर वनराज यांच्यावर हल्ला झाला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी संजीवनी जयंत कोमकर (रा. 309, नाना पेठ), जयंत लक्ष्मण कोमकर, प्रकाश जयंत कोमकर, गणेश लक्ष्मण कोमकर, सोमनाथ सयाजी गायकवाड (रा. आंबेगाव पठार, धनकवडी), अनिकेत दूधभाते (रा. आंबेगाव पठार, धनकवडी), तुषार उर्फ आबा कदम (रा. धनकवडी), सागर पवार (रा. धनकवडी), पवन करताल (रा. मंगळवार पेठ), सॅम ऊर्फ समीर काळे यांच्यासह आणखी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी सूर्यकांत ऊर्फ बंडू राणूजी आंदेकर (वय 68, रा. सोनाई दादा निवास, नाना पेठ) यांनी फिर्याद दिली आहे.