मुंबई : मुंबई पोलिसांच्या प्रतिमेला काळीमा फासण्याचा प्रकार समोर आला आहे. खार पोलिसांकडून एका व्यक्तीला आरोपी बनवण्यासाठी त्याच्या खिशात 20 ग्रॅम ड्रग्ज ठेवण्यात आले. पोलिसांचे हे धक्कादायक कृत्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आणि नंतर ते प्रचंड व्हायरल झाले. यानंतर खार पोलिस स्टेशनमधील चार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं?
सीसीटीव्ही कॅमेरातील चित्रीकरणात दोन पोलीस उभे असल्याचे दिसत आहे. आणि इतर दोघं गोठ्यात काम करणाऱ्या व्यक्तीची झडती घेत आहेत. त्यानंतर झडती घेता घेता त्या व्यक्तीच्या पँटच्या खिशात एक पोलीस ड्रग्ज ठेवताना दिसत आहे. ड्रग्ज प्रकरणात बोगस आरोपी बनवण्यासाठी हे करण्यात आल्याचं समोर आलं आहे.
मुंबई येथील खार परिसरात ३० ऑगस्ट रोजी ही घटना घडली आहे. गोठ्यात काम करणाऱ्या डॅनियल या व्यक्तीला अंमली पदार्थ बाळगल्याच्या संशयावरून खार पोलीस ठाण्यातील चार पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याच्या खिशात २० ग्रॅम मेफेड्रोन सापडल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज तपासण्यात आलं. त्यामध्ये डॅनियलच्या खिशात पोलीसच काही तरी ठेवत असल्याचं दिसून आलं आहे. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.
त्यानंतर पोलिसांनी तातडीने डॅनियलला सोडून दिले. तसेच त्याला केवळ संशयावरून ताब्यात घेण्यात आले होते, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. मात्र सीसीटीव्ही व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या चारही अधिकारी आणि अंमलदारांना निलंबित केलं आहे. पुढील तपस पोलीस करत आहेत.