केज : किराणा दुकानातील चॉकलेट चोरल्याचा संशयातून दुकानदार महिलेने तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या ८ वर्षीय मुलाचे हातपाय बांधून कपड्याने झाडाला बांधल्याचा संतापजनक प्रकार तालुक्यातील येवता येथे गुरूवार २९ ऑगस्ट रोजी घडला. या प्रकरणी तिघाजणांविरुध्द केज ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत मिळालेल्या माहीतीनुसार, केज तालुक्यातील येवता येथे गुरूवार २९ ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद शाळेत इयत्ता तिसरीच्या वर्गात शिकत असलेला बाळू नामक आठ वर्षाचा मुलगा दीर्घ मध्यंतराच्या सुट्टीत घरी आला नाही म्हणून त्याचे वडील संतोष गायकवाड यांनी दुपारी १ वाजता त्याच्या सोबतच्या मुलाकडे चौकशी केली. तेव्हा त्याने माहित नाही असे सांगितले. त्यामुळे संतोष हे दीडच्या सुमारास त्याला शोधण्यासाठी शाळेकडे गेले. तेव्हा त्यांचा मुलगा बाळू हा त्यांना पांडुरंग भाऊराव जोगदंड याच्या घरासमोर झाडाला हात-पाय बांधलेल्या अवस्थेत दिसला.
यावेळी किराणा दुकानदार कविता पांडुरंग जोगदंड हिने ‘तुझा मुलगा चोरटा आहे, त्याने माझ्या दुकानातील चॉकलेट चोरुन घेतले. त्यामुळे मी त्यास झाडाला बांधून ठेवले आहे’ असे उत्तर दिले. यावर संतोष गायकवाड यांनी हे बरोबर नाही असे म्हणताच महिलेचा पती पांडुरंग जोगदंड याने संतोष गायकवाड यांना ‘तुला काय करायचे ते कर’ म्हणत जातीवाचक शिवीगाळ केली.
दरम्यान संतोष गायकवाड यांनी मुलगा बाळूचे बांधलेले हातपाय सोडून त्याची सुटका केली. या घटनेमुळे भयभीत झालेल्या मुलावर केज उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले. याप्रकरणी संतोष गायकवाड यांच्या तक्रारीवरून केज ठाण्यात कविता पांडुरंग जोगदंड, पांडुरंग भाऊराय जोगदंड आणि गोपाळ पांडुरंग जोगदंड या तिघाविरुद्ध गु. र. नं. ४६५/२०२४ भा. न्या. सं. ३५१(२), ३५१ (३), ११५(२), ३(५) यासह अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम १९८९चे कलम ३(१) (एस) ३(१) (आर) नुसार अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
पाणीसुद्धा दिले नाही !
शाळेतून मध्यांतरानंतर घरी येत असतांना कविता जोगदंड यांनी त्याला चॉकलेट का घेतो? असे म्हणून त्याला बळजबरीने धरुन त्याचे हात पाय झाडाला बांधून ठेवले. तो रडायला लागल्यावर त्याला रडलास तर अजून मारेन, असे म्हणून त्याचे पाठीत चापटाने मारले. मुलाने कविता जोगदंड यांना पिण्यासाठी पाणी मागीतले असता त्यानी माझ्या मुलास पाणी सुद्धा दिले नाही, अशी माहीती बाळूच्या वडिलांनी दिली.