मुंबई : राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. सत्तधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असल्याचे दिसून येत आहे. अशातच आता पंतप्रधान मोदी यांनी वाढवण बंदराच्या उद्घाटन सोहळ्यात शिवरायांची माफी मागत या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु, मोदींच्या या वक्तव्यानंतर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करत मोदींवर टीका केली आहे.
प्रायश्चित अटळ आहे : जयंत पाटील
पंतप्रधान मोदी यांनी म्हटले होते की, छत्रपती शिवाजी महाराज माझे आराध्य दैवत आहेत. सिंधुदुर्गात जी घटना घडली त्याबद्दल आम्ही माफी मागतो. मात्र, जयंत पाटील यांनी या मुद्द्यावरुन पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाना साधला आहे. जयंत पाटील म्हटले की, भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणाला महाराजांनी कधीच माफी दिली नव्हती. महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या दाखवलेल्या वाटेवर चालतो. त्यामुळे महाराष्ट्र या चुकीला माफी देऊ शकणार नाही. प्रायश्चित अटळ आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले.
पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणाले..?
मला पंतप्रधानपदाचा उमेदवार निश्चित केल्यानंतर मी रायगड किल्ल्यावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर जाऊन प्रार्थना केली होती. एक भक्त आपल्या आराध्य दैवताची प्रार्थन करतो, तशी मी राष्ट्रसेवेच्या यात्रेला प्रारंभ केला होता. काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गात जे काही घडलं ते माझ्यासाठी आणि माझ्या सहकाऱ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज फक्त एक नाव नाही, फक्त एक राजा नाही, तर शिवाजी महाराज आमच्यासाठी आराध्य दैवत आहेत. आज मी मस्तक झुकवून मी माझं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांच्या पायावर मस्तक ठेवून माफी मागतो.
भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणाला महाराजांनी कधीच माफी दिली नव्हती.
आमचा महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाखवलेल्या वाटेवर चालतो.
त्यामुळे साहेब, महाराष्ट्र या चुकीला माफी देऊ शकणार नाही.
प्रायश्चित अटळ आहे.
जय शिवराय 🚩
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) August 30, 2024
आमचे संस्कार वेगळे आहेत : पंतप्रधान मोदी
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, आमचे संस्कार वेगळे आहेत. आम्ही जे लोक नाही, जे या भूमीचे सुपूत्र वीर सावरकरांना अपमानित करतो, शिव्या देतात. देशभक्तांच्या भावना चिरडतात. तरीही वीर सावरकरांना शिव्या देऊनही माफी मागायला जे तयार नाहीत, ते न्यायालयात लढाई लढायला तयार आहेत. देशाच्या एवढ्या महान सुपूत्राचा अपमान करुन ज्यांना पश्चाताप होत नाही, महाराष्ट्राच्या जनतेने त्यांचे संस्कार ओळखावेत. मी आज महाराष्ट्रात आल्यावर सर्वात पहिले छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागण्याचे काम करत आहे. या घटनेमुळे ज्यांच्या भावना दुखावल्या आहेत, त्या शिवप्रेमींचीही मी माफी मागतो. माझे संस्कार वेगळे आहेत. आमच्यासाठी आमच्या आराध्य दैवताशिवाय काहीही मोठे नाही, असे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.