इंदापूर (पुणे): कॅबिनेट मंत्र्याचा स्वीयसहायक असल्याची बतावणी करून नोकरीस लावण्याचे आमिष दाखवत दोघा जणांना १३ लाख रुपयांना लुबाडल्याच्या आरोपावरून बारामती येथील एक जणाविरुद्ध इंदापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौरभ शिवाजी पवार (रा. कृषी देवतानगर, रवी उदय सहकारी गृहरचना संस्था, बारामती ता. बारामती) असे आरोपीचे नाव आहे. किरण मुकिंदा खरात (वय ३० वर्षे, रा. निरनिमगाव ता. इंदापूर) यांनी त्याविरुद्ध दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले की, आरोपी पवार याने फिर्यादी खरात यांना आपण कॅबिनेटमंत्र्याचे स्वीय सचिव आहोत. आपल्या मंत्रालयात भरपूर ओळखी आहेत. मंत्रालयात सहायक कक्ष अधिकारी या पदाची भरती निघाली आहे. तेथे तुला नोकरीस लावतो, असे सांगून मार्च २०२३ पासून तक्रार दाखल करण्याच्या आधीपर्यंत वेळोवेळी ५ लाख १० हजार रुपये घेतले. तसेच मयूर संजय रणनवरे (रा. राख, ता. पुरंदर) यास नवोदय विद्यालयामध्ये लिपिकाची नोकरी लावतो म्हणून एकूण ८ लाख रुपये घेतले. दोघांनाही नोकरीस लावले नाही. आरोपीने फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर खरात यांनी मंगळवारी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. फौजदार विनायक दडस अधिक तपास करत आहेत.