पुणे : पुण्यातील लोणीकंद परिसरात एक संतापजनक घटना घडली आहे. तुमच्यामुळे रोडवर ट्राफिक जाम होत आहे, तुम्ही रोडचे बाजूला व्हा, असे म्हणाल्याच्या कारणावरुन कारमधील तिघांनी चौघांच्या अंगावर कार घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या घटनेत जगदीश सुरेश शिवेकर (वय-३०), सुहास हरिदास शिंदे, सोनम कविता अंधारे (वय-२६), आश्विनी दत्तु पावसे (वय-२०) हे गंभीर जखमी झाले आहेत.
याप्रकरणी संकेत चिंधु पडवळ (वय-२४, रा. कुरकुंडी, ता. राजगुरुनगर) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी गौरव दिपक लगड (वय-२२, रा. भारत पेट्रोलपंपाशेजारी, तुळापूर), अविनाश बनकड शेळके (रा. आळंदी) आणि सुरेखा अनंत सवने (रा. तुळापूर) यांच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना तुळापूर -आंळदी रोडवरील अर्मासेल कंपनी समोरील रोडवर मंगळवारी (दि. २७) रात्री सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोडवर ट्रॉफिक जाम झाले होते. तेव्हा जगदीश शिवेकर हा आरोपींना रोडवर ट्रॉफिक जाम होत आहे, तुम्ही रोडचे बाजूला व्हा, असे म्हणाला. त्यावरुन तिघांनी कारमधून उतरुन आश्विनी यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. त्यानंतर गौरव याने त्यांची अल्ट्राज कार भरधाव त्यांच्या दिशेने चालवून तुमचा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही, असं म्हणून त्यांच्या अंगावर गाडी घातली.
या घटनेत तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. सुरेखा हिने तू यांना सोडू नकोस, असं म्हणून त्याला चिथावणी दिली. त्याने रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या स्विफ्ट कार व मोटार सायकलला जोरदार ठोस देऊन त्यांचे नुकसान केले. या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक घोरपडे करीत आहेत.