-संतोष पवार
पळसदेव (पुणे) : मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील शाळांच्या शिक्षकेत्तर कर्मचारी भरतीवरील असलेली स्थगिती उठवल्याने तब्बल 17 वर्षानंतर शिक्षकेत्तर पदभरतीचा मार्ग मोकळा झाला होता. परंतु संचमान्यतेमुळे पदभरतीला मुहूर्त लागत नव्हता. अखेर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक संपत सुर्यवंशी यांनी संचमान्यतेनुसार पदनिश्चिती करण्याचे निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे शिक्षकेत्तर कर्मचारी पदभरतीचा मार्ग आता मोकळा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक संपत सुर्यवंशी यांनी दिलेल्या निर्देशानुसार, 30 सप्टेंबर 2023 रोजी नोंद असलेली आधार प्रमाणित विद्यार्थी संख्या लक्षात घेऊन 28 जानेवारी 2019 च्या सुधारित आकृतीबंधानुसार एकूण मंजूर पदांच्या मर्यादेत व जिल्हानिहाय अनुज्ञेय होणाऱ्या पदांच्या मर्यादेत संस्थांना पदे निर्माण करून, सन 2023 /24 च्या शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची संचमान्यता शिक्षणाधिकारी लॉगिनला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. संचमान्यता सुधारित आकृतीबंधानुसार एकूण मंजूर पदांच्या मर्यादेत आणि जिल्हानिहाय अनुज्ञेय होणाऱ्या पदांची पडताळणी जास्त पदे मंजूर होत असलेल्या करून निर्गमित कराव्यात.
शासननिर्णय आकृतीबंधानुसार शिक्षकेत्तर पदांची संच मान्यता 30 सप्टेंबर 2023 रोजी नोंदलेली व संच मान्यता निर्गमित केल्याच्या दिनांकाअखेर आधार वैध विद्यार्थी संख्येच्या आधारे निर्गमित करताना अनुज्ञेय होणारी पदे मूळ पायाभूत पदांपेक्षा अधिक होत असतील तर मंजुरीची कार्यवाही शासनाच्या पूर्वपरवानगीने करावी. रिक्त पदे प्रथम समायोजनाने भरण्याची कार्यवाही करावी. सन 2023 / 24 च्या शिक्षकेत्तर संचमान्यता 30 सप्टेंबर 2023 च्या पटावरील अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमधील आधार वैध विद्यार्थी संख्येच्या आधारे करण्यात आलेली आहे.
माध्यमिक शाळांतील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या संचमान्यता उपलब्ध करून दिल्यामुळे अनेक वर्षापासून रिक्त असणारी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पदे आता विधानसभा निवडणुक आचारसंहितेपूर्वी भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याबद्दल माननीय शिक्षणमंत्री व शिक्षण विभागातील सर्व अधिकाऱ्यांचे आपण आभारी आहोत, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर संघटना महामंडळाचे सरकार्यवाह शिवाजीराव खांडेकर यांनी पुणे प्राईम प्रतिनिधीशी बोलताना दिली..