मुंबई : प्रकल्पबाधितांना एमएमआरडीएकडून मिळणारे घर आणि दुकान गाळा स्वस्तात मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका ठगाने मुलुंडमधील डॉक्टरकडून १६ लाख २५ हजार रुपये घेत त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नितीन साळवी नावाच्या आरोपीविरोधात गुन्हा दाखल करून भांडुप पोलीस अधिक तपास करीत आहेत.
मुलुंडमधील रहिवासी असलेले ४० वर्षीय तक्रारदार डॉक्टर हे भांडुपमधील एका हॉस्पिटलमध्ये रुग्णांना तपासायला जात असताना त्यांची ओळख नितीन साळवी नावाच्या व्यक्तीशी झाली. साळवी याने त्याची पत्नी श्वेता एमएमआरडीएमध्ये उच्च पदावर नोकरीला असल्याची बतावणी केली. पुढे त्याने तक्रारदार
डॉक्टर यांना रेल्वेच्या हद्दीत असलेल्या घरांच्या निष्कासनानंतर एमएमआरडीएकडून मिळणारे घर आणि दुकान गाळा स्वस्तात मिळवून देण्याचे आमिष दाखविले. यासाठी लागणारी प्रकल्पबाधित असल्याची कागदपत्रे तोच तयार करून घेणार होता.
कांजूरमार्ग पूर्व येथील एमएमआरडीएच्या प्रकल्पातील घर आणि दुकान गाळा मिळवून देतो, असे सांगून साळवीने तक्रारदार डॉक्टरांकडून १६ लाख २५ हजार रुपये उकळले. पण, तक्रारदार डॉक्टर यांना ना घर किंवा दुकान गाळा मिळाला ना दिलेली रक्कम परत मिळाली. आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्याने तक्रारदार डॉक्टर यांनी भांडुप पोलीस ठाणे गाठून नितीन साळवीविरोधात आर्थिक फसवणुकीची तक्रार दिली आहे.