इंदापूर : रजेचा अर्ज मंजूर करण्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ बाचाबाचीतून इंदापूर एसटी आगारातील पाळी प्रमुखाने ‘तुला खलास करतो’ अशी धमकी देत आगार व्यवस्थापकाच्या डोक्यात खुर्ची घातली. यामध्ये आगार व्यवस्थापक गंभीर जखमी झाले. हा प्रकार सोमवारी (दि. २६) सकाळी इंदापूर बसस्थानकात घडला. या प्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आगार व्यवस्थापक हनुमंत गंगापुरी गोसावी (वय ५१ वर्षे, सध्या रा.एस.टी.क्वॉर्टर्स राजेवलीनगर, इंदापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गोकुळ रामचंद्र जाधव (रा. माळेगाव, ता. बारामती) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी सांगितले की, आगार व्यवस्थापक हनुमंत गोसावी हे सोमवारी सकाळी बस स्थानक प्रमुख संजय वायदंडे, वाहतूक नियंत्रक निवृत्ती घनवट व लिपिक तौसीफ शहाबुद्दीन शेख यांच्या समवेत आगार व्यवस्थापक दालनात दैनंदिन आढावा मिटिंग घेत होते. त्यावेळी इंदापूर एसटी डेपोमध्ये पाळीप्रमुख गोकुळ जाधव तेथे आला. ‘माझा रजेचा अर्ज त्वरित मंजूर करा’ असे त्याने गोसावी यांना सांगितले. गोसावी यांनी मिटिंग झाल्यानंतर या, असे सांगितल्यावर जाधव याने चिडून गोसावी यांना अर्वाच्च शिवीगाळ करून ‘तू माझे वाटोळे केले आहे. तुला बघून घेतो, तुला खल्लास करतो’ अशी धमकी देऊन दालनातील खुर्चीने त्यांना मारहाण केली. तेथील उपस्थितांनी जाधव याच्या तावडीतून गोसावी यांना सोडवले. उपजिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेऊन आल्यानंतर गोसावी यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून जाधव याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास हवालदार सुनील कदम करीत आहेत.