पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरामध्ये गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे. शुल्लक कारणावरून तरुण पिढी दहशत निर्माण करत आहे. अशातच आता खरेदी केलेल्या साहित्याचे पैसे मागितले म्हणून टपरी चालक 60 वर्षीय महिलेवर धारदार तलवारीने जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी २६ ऑगस्ट रोजी पिंपरी परिसरातील भाट नगर येथे घडली आहे.
या प्रकरणी साठ वर्षीय महिलेने पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यावरून मॅड गण्या कांबळे (वय-22), तोफ्या शेख (वय-22) या दोघाजणांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची पिंपरी येथील भाट नगर परिसरात त्यांची टपरी चालवतात. आरोपीने टपरीतून काही साहित्य खरेदी केले होते. परंतु, खरेदी केलेल्या साहित्याचे पैसे दिले नव्हते. या पैशाची मागणी फिर्यादी यांनी केली असता आरोपीने रागाच्या भरात येऊन त्याच्या साथीदाराच्या मदतीने फिर्यादी यांच्या डोक्यात तलवारीने वार केले. तसेच टपरीची तोडफोड करून नुकसान केले.
एवढंच नाही तर, जर कोणी म्हातारीच्या मदतीला आले तर एक एकाला खलास करून टाकू अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यावरून पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.