सिंधुदुर्ग : मावलण येथील राजकोट किल्ल्यावर मोठा राडा झाला आहे. ज्यानंतर राज्यात राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या. महाविकास आघाडीतील नेतेमंडळी आज घटनास्थळी भेट देण्यासाठी राजकोट किल्ल्यावर गेली होती. दरम्यान, राणे आणि ठाकरे समर्थक यांच्यात जोरदार हाणामारी झाली. यावेळी स्वत: नारायण राणे यांनी पोलिसांसमोर येऊन काही जणांना इशाराच दिला. आमच्या जिल्ह्यात येऊन दमदाटी खपवून घेतली जाणार नाही. त्यावेळी, थेट घरातून खेचून रात्रभर मारीन असा इशाराही नारायण राणे यांनी यावेळी दिला.
सिंधुदुर्ग मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज पाहणी केली. यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विजय वडेट्टीवार, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष जयंत पाटील, माजी खासदार विनायक राऊत हे राजकोट किल्ल्यावर आले.
यावेळी राणे पुढे म्हणाले, आम्ही आमच्या भागात आहोत, बाहेरचे येऊन इथं दादागिरी करत असतील, पोलीस त्यांना प्रोटेक्शन देणार असतील तर आम्ही इथून अजिबात हलणार नाही, काही करायचे ते करा, गोळ्या घाला हलणार नाही, असे आंडू पांडू आयुष्यभर पाहिले, आम्ही इथून जाणार नाही, असा आक्रमक पवित्रा नारायण राणे यांनी घेतला होता.
आदित्य ठाकरे आले असताना नारायण राणे हे त्यांचा मुलगा निलेश राणेंसह राजकोट किल्ल्यावर दाखल झाले आहेत. यावेळी पोलिसांनी राणे आणि त्याच्या कार्यकर्त्यांना राजकोट किल्ल्याच्या पायथ्याशीच थांबवलं. यानंतर राणेंच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली.