निलंगा : बदलापूरमधील एका नामांकित शाळेतील दोन चिमुकल्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर संपूर्ण राज्यात संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात सुद्धा प्रकरणावरून आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. शाळेतील स्वच्छता कर्मचाऱ्यानेच दोन्ही मुलींवर अत्याचार केल्याचं उघड झाल्यानंतर मोठा जनक्षोभ उसळला होता. नागरिक रस्त्यावर उतरले होते. यानंतर राज्यभरात अशा अनेक घटना घडत आहेत. यामुळे महिलांच्या सुरक्षेबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अशातच आता महिलांवरील वाढत्या अत्याच्यारांच्या घटनांविरोधात भाजप आमदार पंकजा मुंडे यांनी संताप व्यक्त केला आहे. अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली आहे.
बलात्कारासारखे कृत्य करणाऱ्याला भर चौकात फाशी..
राज्यात घडत असलेल्या बलात्कार आणि महिलेवर अत्याचाराच्या घटना ऐकून मला खूप वेदना होत आहेत. अत्याचांरांना बळी पडणाऱ्या पिडीतांना न्याय मिळालाच पाहिजे असं पकंजा मुंडे आक्रमकपणे म्हणाल्या. बलात्कारासारखे कृत्य करणाऱ्याला भर चौकात फाशी दिली पाहिजे अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली.
निलंगा मतदारसंघात गेल्या चार दिवसांपासून आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांची जन सन्मान पदयात्रा सुरू आहे. या जन सन्मान पदयात्रेचा आज चौथा दिवस आहे. ही पदयात्रा आता वलांडी येथे पोहोचली आहे. या पदयात्रेत भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे या सहभागी झाले होत्या. यावेळी त्यांनी ही मागणी केली आहे.