पुणे : पुण्यात बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. अशातच आता हडपसर परिसरातील एका शाळेतील शिक्षकाने नववीत शिक्षण घेत असलेल्या मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना जुलै २०२४ ते २६ ऑगस्ट २०२४ या कालावधीत भेकराई नगर येथील एका शाळेमध्ये घडली आहे.
या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. त्यावरून आरोपी शिक्षक गणेश काकड याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेत आहे. दरम्यान, पीडित मुलगी २६ ऑगस्ट रोजी घरी रडत होती. त्यावेळी आईने तिला रडत का आहे अशी विचारणा केली असता तिने घडलेला सर्व प्रकार सांगितलं. जुलै २०२४ मध्ये मुलगी शाळेत असताना आरोपी गणेश काकड या शिक्षकाने तिच्या घराचा पत्ता विचारला. तसेच वर्गामध्ये शिकवत असताना ‘तू माझ्याकडे बघत जा. इकडे तिकडे बघत जाऊ नकोस. तू सुंदर आहे, असं म्हणून विनयभंग केला.
त्यावेळी मुलीने आरोपीला कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर काही दिवसांनी मुलगी घरी चालत निघालेली असताना आरोपी हा शाळेच्या प्रवेशद्वारा जवळ उभा होता. त्यावेळी त्याने ‘तू घरी चालली आहेस का? मी तुला घरी सोडू का? तू कुठे राहतेस?’ अशी विचारणा केली. या प्रकाराबाबत पीडित मुलीने शाळेच्या उपप्राचार्य यांना देखील कल्पना दिली होती. त्यांना भेटून हा सर्व प्रकार सांगितला होता. त्यावेळी उपप्राचार्यांनी काकड याला समजावून सांगण्याऐवजी या मुलीलाच ओरडण्यास सुरुवात केली आणि तिला ‘तूच तशी आहेस, म्हणून तुला सगळे तसे दिसतात’ असे म्हणत तिच्या तक्रारीची दखल घेतली नाही.
त्यानंतर २६ ऑगस्ट रोजी पीडित शाळेच्या मैदानात उभी होती त्यावेळी आरोपीने तिला ‘तू शिट्टी का वाजवली? असे विचारण्याचा बहाना करून तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, काकड हा नेहमी मुलीवर बारकाईने लक्ष ठेवतो आणि तिचा पाठलाग करून नेहमी बोलण्याचा प्रयत्न करतो. तसेच जवळ येण्याचा प्रयत्न करतो, असं पीडित मुलीने आईला सांगितले. त्यानंतर आईने हडपसर पोलीस ठाणे गाठून याप्रकरणी तक्रार दाखल केली. पोलिसांनी या घटनेची तात्काळ दखल घेत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत.