उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन येथून बाजार घेऊन अष्टापूरच्या बाजूने निघालेल्या एका 57 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह रस्त्यावर आढळून आला आहे. सोमवारी (ता. 26) सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हि घटना उघडकीस आली आहे. हा अपघात की घातपात याबाबत संशय असून उरुळी कांचन पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मच्छिंद्र नारायण काळे वय (57, रा. अष्टापुर फळीवस्ती ता. हवेली) असे मृतदेह आढळून आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा मुलगा लक्ष्मण मच्छिंद्र काळे (वय -29, रा. अष्टापुर, फळीवस्ती) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार उरुळी कांचन पोलिसांनी पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
उरुळी कांचन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे फुलगाव येथील एका कंपनीत कामाला आहेत. रविवारी (ता. 25) संध्याकाळी कामावरून घरी आले त्यावेळी घरी वडील दिसून न आल्याने त्यांनी आपल्या आईला वडिलांबद्दल विचारले. यावेळी त्यांच्या आईने त्यांना वडील हे उरुळी कांचन येथे बाजार आणण्यासासाठी दुपारी दुचाकी घेऊन गेले आहेत. अद्यापपर्यंत घरी आले नसल्याचे सांगितले. रात्री उशीर झाला तरी ते घरी आले नाहीत पण ते मित्राबरोबर गेले असतील असे समजून घरातील सर्वजण रात्री झोपी गेले.
दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी गावातील सामाजिक कार्यकर्ते केतन निकाळजे यांनी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास लक्ष्मण काळे यांना मोबाईल फोन वरून कळवले की तुमच्या वडिलांचा भवरापूर येथे गोळीबार मैदानाजवळ अपघात झालेला दिसत आहे. तरी तुम्ही लवकर इकडे या त्यानुसार घटनास्थळी दाखल झाले असता रस्त्याच्या दोन्ही बाजूला नागरिकांनी गर्दी केली होती.
रस्त्याच्या बाजूला दुचाकी पडलेली दिसून आली. तसेच रस्त्याच्या बाजूला मच्छिंद्र काळे हे खड्ड्यात पालथे स्थितीत पडलेले दिसून आले. यावेळी त्यांच्या डोक्याला तोंडाला नाकाला जखमा झाल्याचे दिसून आले. त्यांची काही एक हालचाल दिसत नव्हती. त्यांची काही एक हालचाल दिसत नसल्याने ॲम्बुलन्स बोलावून तेथून त्यांना उरुळी कांचन येथील सरकारी दवाखान्यात घेऊन आले. यावेळी उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अपघातामध्ये मयत झाले असल्याची तक्रार उरुळी कांचन पोलीस ठाण्यात दिली आहे.
दरम्यान, याप्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील कार्यवाही सुरु आहे. तपास पोलीस अंमलदार शेख करीत आहेत.