धुळे : राज्यात गुन्हेगारीचं प्रमाण कमी होण्याचं नाव घेत नाही आहे. अशातच आता धुळे जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. रस्त्याने पायी चालणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगल पोत हिसकावून चोर पसार झाला आहे. दरम्यान, पोलिसांनी तपास करत पश्चिम देवपूर पोलिसांनी चोरट्याला अटक केली आहे. चोरट्याने चोरलेली तीन तोळ्याची मंगल पोत पोलिसांनी जप्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धुळे शहरातील पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या अनमोलनगर येथील महिलेची चोरट्याने मंगल पोत गळ्यातून तोडून त्या ठिकाणाहून तो पसार झाल्याची घटना रविवारी संध्याकाळी समोर होती. या संदर्भात सदर महिलेने पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात यासंदर्भातील तक्रार दिली होती. त्यानुसार पश्चिम देवपूर पोलिसांनी परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेराच्या मदतीने व गुप्त माहिती दारा मार्फत माहिती मिळवली.
नकाने रोडवरील छत्रपती हॉस्पिटलजवळ पांझरा नदीकिनारी चोर उभा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ संबंधित ठिकाणी धाव घेत त्या ठिकाणी एक संशयित त्यांना दिसून आला. पोलिसांनी त्याला हटकले असता त्याने त्या ठिकाणाहून पळ काढण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी शिताफीने या चोरट्याच्या मुसक्या आवळ्या असून त्याच्याकडून चोरलेली तीन तोळे सोन्याची मंगल पोत जप्त करण्यात आली.