-संतोष पवार
पळसदेव : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोरवडी (ता. दौंड) येथे शिक्षण विभागाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या आनंददायी शनिवार उपक्रमा अंतर्गत मातृपितृ पुजन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना संस्कारक्षम शिक्षण देण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडावा, या हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक आणि महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राजाध्यक्ष गौतम कांबळे यांनी दिली.
आनंददायी शनिवार या उपक्रमातंर्गत राबवलेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी आपले आई-वडील, आजी- आजोबा यांचे पूजन करून त्यांना औक्षण केले व त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली. बालमनावर केलेले संस्कार दीर्घकाळ स्मरणात राहतात व एक माणूस म्हणून जगण्यासाठी ते खूप उपयोगी असतात. यासाठी संस्कारक्षम शिक्षण देणे काळाची गरज आहे, असे मत कांबळे यांनी व्यक्त केले. तद्नंतर पालक सभेत विद्यार्थ्यांची सुरक्षितता , विद्यार्थी आरोग्य स्वच्छता याबाबत विशेष काळजी आदि विषयांवार चर्चा करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजित कोंडेजकर यांनी केले. यावेळी मुख्याध्यापक गौतम कांबळे, योगेश देशमुख, नीता भद्रे शितल कदम, साक्षी कोंडेजकर आदिंसह पालकवर्ग विद्यार्थी उपस्थित होते.