पुणे : पुण्यामधून धक्कादायक माहिती समोर येत आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर “सर तन से जुदा” करणाऱ्या घोषणा दिल्याचा प्रकार उघड झाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये हा प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे. समाजामध्ये सार्वजनिक शांततेचा भंग होऊन असुरक्षितता व भितीचे वातावरण निर्माण केल्याप्रकरणी पुण्यात 300 जणांवर गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे.
२०० ते ३०० जणांवर गुन्हा दाखल..
सविस्तर माहिती अशी की, सरला गोवर्धनचे मठाधिपती रामगिरी महाराज यांनी वादग्रस्त विधान केले होते. त्याचा राज्यभरात निषेध व्यक्त केला जात आहे. रामगिरी महाराज यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध म्हणून पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्वधर्म समभाव महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काही ठराविक लोकांनी “सर तन से जुदा” तसेच टिपू सुलतान समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात बेकायदेशीर जमाव जमवुन विनापरवानगी मोर्चा काढून, मोर्चामध्ये बेकायदेशीरपणे सामील होऊन, त्यांना दिलेल्या भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६८ प्रमाणे नोटीसचे उल्लंघन केल्यामुळे २०० ते ३०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी नाशिकमधील सिन्नरच्या पंचाळे गावामध्ये प्रवचनादरम्यान प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यांनतर राज्यभरातील मुस्लिम बांधवांनी संताप व्यक्त केला होता.