पुणे : पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील पौडजवळ हेलिकॉप्टर कोसळल्याची घटना घडली आहे. पुणे जिल्ह्यातील पौडमधील घोटावडे येथे ही दुर्घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा आणि अग्निशमन दलाचे जवान, रुग्णवाहिकाही घटनास्थळी दाखल झाले आहेत. जिल्ह्यात सर्वदूर पाऊस कोसळत असताना ही घटना घडली आहे.
अपघाताचे तांत्रिक कारण अद्याप समोर आले नाही. मात्र, बदलते हवामान तसेच सततच्या पावसामुळे हेलिकॉप्टरचा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या अपघातात पायलटसह आणखी तीन प्रवासी जखमी झाले आहेत. घोटावडेमध्ये अचानक अपघात झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ग्लोबल हेक्ट्रा या कंपनीचे हे हेलिकॉप्टर आहे. मुंबईहून उड्डाण करून हे हेलिकॉप्टटर हैदराबादच्या दिशेने जात होतं. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील पौडनजवळ आल्यानंतर हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने हेलिकॉप्टर थेट जमिनीवर कोसळलं. घोटावडेच्या दिशेनं येणारं हेलिकॉप्टर घटनास्थळी घिरट्या घालताना काही प्रत्यक्षदर्शींना दिसलं. त्यानंतर ते जमिनीवर कोसळलं.
हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर मोठा आवाज झाला. या हेलिकॉप्टरमधून चार लोक प्रवास करत होते. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तसेच शेजारच्या गावातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि युद्धपातळीवर बचावकार्य सुरू केलं.
दिर भाटिया, अमरदिप सिंग, एसपी राम अशी हेलिकॉप्टरमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची नावं आहेत. ते किरकोळ जखमी झाले आहेत. तर पायलट गंभीर जखमी झाला असून त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कॅप्टन आनंद असं पायलटचं नावं आहे.