सातारा : साताऱ्यामधून एका भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. सातारा जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे नेते, माण खटाव विधानसभेचे आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील गाडीने एका दुचाकीस्वाराला उडवले आहे. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर दुसऱ्या जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सातारा जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे नेते, माण- खटाव विधानसभा मतदार संघाचे आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील गाडीचा भीषण अपघात झाला आहे. आमदार गोरे यांच्या ताफ्यातील गाडीने एका दुचाकीला उडवले असून यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झाला होता, परंतु त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
दोघांचा मृत्यू..
दहिवडीजवळील बिदाल शेरेवाडी भागामध्ये ही घटना घडली असून आमदार जयकुमार गोरे यांच्या ताफ्यातील एसयुव्हीने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून तर एक गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. अपघातानंतर जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु त्याचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात इतका भीषण होता की, आमदारांच्या ताफ्यातील गाडीचे सुद्धा मोठे नुकसान झाले आहे तर धडक दिलेल्या दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. याबाबत अधिक तपास सुरू आहे.