ठाणे : बदलापूरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचारामुळे संपूर्ण देश हादरला असून राज्यात एकच संतापाची लाट आहे. या प्रकरणामुळे विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आरोपात प्रत्यारोप होत आहेत. आता अशातच बदलापूर घटनेबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे. या समितीच्या प्राथमिक अहवालानुसार बदलापूरमधील त्या अल्पवयीन मुलींवर 15 दिवसांपासून अत्याचार होत होते. अशी धक्कादायक बातमी समोर आली आहे.
अहवालात काय म्हटले आहे?
1) गेल्या पंधरा दिवसांत अल्पवयीन मुलींवर अनेकदा लैंगिक अत्याचार झाले असण्याची शक्यता.
2) त्या पीडित अल्पवयीन मुलीच्या गुप्तभागाला जवळपास एक इंच इजा झाली आहे.
3) 1 ऑगस्ट रोजी शाळेत कंत्राटी कर्मचारी म्हणून रुजू झालेला आरोपी अक्षय शिंदे याची पार्श्वभूमी न तपासता भरती करण्यात आली.
4) त्याची नियुक्ती आउटसोर्स एजन्सीद्वारे केली गेली की कोणाच्या शिफारशीने हे शोधण्याची गरज आहे
5) त्याला शाळेच्या आवारात सगळीकडे कोणत्याही ओळखपत्रा-शिवाय सहज प्रवेश होता..
6) हे प्रकरण हाताळण्यात आलेल्या अपयशाबद्दल अधिक माहिती मिळविण्यासाठी बाल हक्क आयोगाकडून प्रश्नांचा संच शाळा प्रशासनाला पाठवला गेला असून येत्या सात दिवसांत उत्तरे मागवली जातील.
7) पीडितेवर उपचार करण्यासाठी हॉस्पिटलला 12 तास लागले.
8) तक्रारीनंतरही शाळा प्रशासनाने पालकांची भेट घेतली नाही.
9)शाळा प्रशासन तब्बल 48 तास तक्रारीवर शांत बसल्याचे दिसून आले.
नेमके प्रकरण काय?
बदलापूरमध्ये काही दिवसांपूर्वी एका शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली होती. या घटनेनंतर संपूर्ण बदलापूरमधील नागरिकांनी रस्त्यावर उतरून संबंधित शाळेच्या बाहेर आंदोलन केले होते. तर काही आंदोलकांनी बदलापूर रेल्वे स्थानकावर जाऊन रेल्वे रोखून धरल्या होत्या. या प्रकरणातील आरोपील आत्ताच्या आता फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी जनतेने केली होती. शाळेतील एका सफाई कर्मचाऱ्याने हे घृणास्पद कृत्य केले होते.