अक्षय टेमगिरे
रांजणगाव गणपती : शिरूर येथील सेंट जोसेफ शाळेची बदनामी करण्याकरिता खोटी फिर्याद दाखल केली. या विरोधात न्यायालयात मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचे नॅन्सी पायस यांनी सांगितले. आमच्याविरूद्ध केलेल्या तक्रारीत कुठलेही तथ्य नसून, शाळेच्या बदनामीचा हा कट केला असल्याचे सेंट जोसेफ शाळेच्या मुख्याध्यापिका नॅन्सी पायस यांनी पत्रकार परिषदेत सांगीतले. सुमन साळवे त्यांचा पती व मुलगा यांनी केलेल्या खोट्या आरोपाविरूध्द न्यायालयात त्यांच्या विरूध्द मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचे पायस यांनी सांगीतले.
याबाबत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांना निवेदन दिले असुन आमच्या विरोधात खोटा गुन्हा दाखल झाला आहे आम्ही देखील याप्रकरणी कायदेशीर मार्गाचा वापर करणार असल्याचे सांगीतले. सुमन साळवे व त्यांचा मुलगा अनाधिकाराने शाळेत आले होते. त्यांनी परवानगी न घेता व्हिडिओ चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये महीला यांचाही व्हिडिओ ते काढत होते. त्याला मी विरोध केला असतां त्यांनी शाळेत गोंधळ घातला. शिक्षकांवर धावून आले. आम्ही त्याचवेळी पोलिसांना ११२ ला कॉल करून बोलावले होते व त्यासंदर्भात तक्रारही पोलिसात दिली होती.
शाळेतील एका शिक्षकाचा वाढदिवस साजरा करीत असताना संगीत लावले होते. डीजे लावला नव्हता यावेळेस शाळेत काम करणाऱ्या शिक्षिका ही तिथे उपस्थित होत्या. त्यांच्यावर दारू पिण्याचे आरोप केल्याने त्या दुखावल्या गेल्या आहेत. अशा प्रकारचे खोटे आरोप आमच्यावर केले आहेत. शाळेत आम्ही बोलावल्यानंतर पोलीस आले होते. तसेच त्यानंतर पोलीस स्टेशनला ही आम्ही फिर्याद दिली आहे. याबाबत आमच्याविरूद्ध खोटा गुन्हा दाखल झाला असून, आम्ही देखील याप्रकरणी कायदेशीर मार्गाचा अवलंब करणार असल्याचे पायस यांनी सांगीतले आहे.